ज्यांनी ऐन दिवाळीत तीन महिने कारागृहात टाकले त्यांना विजयाचे फटाके कसे फोडु देणार!

0

– भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेद्वारे संदेश

पाचोरा :- पाचोरा मतदार संघात गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना – भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सापा – मुंगसा सारखे वैर असुन भाजपाच्या वरिष्ठांच्या सहकार्याने सेनेच्या प्रमुख १५ पदाधिकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करून ऐन दिवाळीच्या सणात तीन महिने सब जेल मध्ये राहावे लागले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेची सत्ता असतांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ना. गिरीष महाजन यांचे सहकार्य घेवुन शिवसेनेची सत्ता घालविली. जळगांव जिल्हा परिषदत भाजपाने कॉंग्रेसशी हात मिळवणी करित सेनेला सत्ते पासुन दुर ठेवले. पाचोरा पंचायत समितीत ही कॉंग्रेसच्या एका सदस्याचे सहकार्य घेवून सत्ता स्थापन केली. यामुळे जळगांव लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराला का मदत करावी? व भाजपाला विजयाचे फटाके कसे फोडु द्यावे? अशी कैफियत शिवसेनेचे बाजार समितीचे माजी सभापती अँड. दिनकर देवरे, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपुत, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी (भडगांव), संजय (भुरा आप्पा) पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे आमदार किशोर पाटील यांच्याकडे मांडली.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना – भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय वैर असुन विविध सभा व बैठकांमधुन एकमेकांवर खालच्या पातळीवर येवुन आरोप – प्रत्यारोप करण्यात आले आहे. जळगांव लोकसभेची जागा भाजपाकडे असल्याने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. निवडणूकीत भाजप उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असुन येथील शिवसेना कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन प्रचार न करण्याचे कारणे सांगतांना अॅड दिनकर देवरे म्हणाले की, पाचोरा पंचायत समितीत भाजपाची सत्ता असुन पाचोरा तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असतांना पाणी टंचाईवर आमदार किशोर पाटील यांनी येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ बैठक आयोजित केली होती.

यावेळी पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामसेवकांना टंचाई बैठकीला येण्यास मज्जाव केला होता. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपुत, अरुण पाटील, तालुका अध्यक्ष शरद पाटील, हे पंचायत समितीत गेले असता त्यावेळी सभापती व सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खुर्चांनी तोडफोड व शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ना. गिरीष महाजन यांचे सहकार्यांने दबावतंत्र वापरुन सहाय्यक गट विकास अधिकारी विलास सनेर यांना पुढे करुन सेनेच्या १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुध्द शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केल्याने ऐन दिवाळीत पदमसिंग पाटील, शरद पाटील, अरुण पाटील यांना तीन महिने जळगांवच्या कारागृहात राहावे लागले होते. तर रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत यांचेसह १३ जणांना तीन महिने गाव सोडुन रहावे लागले होते.

पाचोरा बाजार समितीत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ना. गिरीष महाजन यांचे सहकार्य घेवुन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेतुन खाली उतरविले. याशिवाय सेना – भाजपाची अनेक वर्षांपासून युती असतांना जळगांव जिल्हा परिषदेत व पाचोरा पंचायत समितीत काॅंग्रेसचे सहकार्य घेवुन शिवसेनेला सत्तेपासुन दुर ठेवले. यासारखी कारणे देवुन मग आता आम्ही भाजपाचा प्रचार का करावा ? व भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना निवडुन आणण्यासाठी का प्रयत्न करावे ? आम्ही भाजपाचा प्रचार करणार नसलो तरी याचा अर्थ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सहकार्य करु असाही नाही. राज्यभरात शिवसेनेचे २३ उमेदवार असल्याने आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असा खुलासा ही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आमदार किशोर पाटील यांच्याकडे मांडुन भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सेना – भाजपाची युती झालेली असल्याने व वरिष्ठांचा आदेश आणि युती धर्म पालन करणे माझे कर्तव्य असल्याने मी उद्यापासुनच भाजपाच्या उमेदवाच्या प्रचारास सुरुवात करणार आहे. मात्र मी शिवसेनेचे मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भरवश्यावरच माझे राजकीय भवितव्य विसंबुन आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय सहन करणे मला शक्य होणार नाही. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या भावना लोकसभा निवडणुकीच्या समन्वय समितीतील सदस्य ना. गिरीष महाजन व ना. दादा भुसे यांच्या पर्यंत पोहचविण्याचे आश्र्वासन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.