जिल्ह्यात दिव्यांग बोर्डाला उत्तम प्रतिसाद ; आतापर्यंत १४०० जणांची तपासणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मुक्ताईनगर व चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्ड सुरु करण्यात आलेले आहे. या बोर्डामार्फत आतापर्यंत १४०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८५६ प्रकरणे वैध ठरली आहे. ८५६ पैकी ८१६ दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात दिव्यांग बोर्ड तालुका पातळीवर सुरु व्हावे म्हणून दिव्यांग बांधव तसेच संघटनांची मागणी होती. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुका पातळीवरील उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग बोर्ड सुरु करावे असे दोन महिन्यांपूर्वी निर्देश दिले होते. त्यानुसार मुक्ताईनगर व चोपडा उपजिल्हा रुग्णालयात २३ नोव्हेंबर पासून दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी याबाबत संबंधित उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत.

मुक्ताईनगर येथे २३ नोव्हेंबर रोजी ७५० दिव्यांगांची तपासणी झाली. त्यात ३०० दिव्यांगांची प्रकरणे वैध झाली. तर १५ डिसेंबर रोजी २०० जणांची तपासणी होऊन ६८ जणांची प्रकरणे वैध झाली. चोपडा येथे ३० नोव्हेंबर रोजी ३५० जणांची तपासणी होऊन २४८ वैध तर २९ डिसेंबर रोजी १०० जणांची तपासणी होऊन ४० प्रकरणे वैध ठरली. एकूण ८५६ वैध प्रकरणातील ८१६ जणांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित झाले असून ४० कार्यवाहीच्या टप्प्यात आहेत.

दिव्यांगांची तपासणी करण्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय कुरकुरे, डॉ. सचिन अहिरे, डॉ. अजय सोनवणे, डॉ. जाधव, कान-नाक-घसा विकार तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे, दौलत निमसे, बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कळसकर यांचे वैद्यकीय पथक नेमलेले आहे.

मुक्ताईनगर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे तर चोपडा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या समन्वयाखाली कामकाज सुरु आहे. पुढील दिव्यांग बांधवांचे शिबीर ५ जानेवारी रोजी मुक्ताईंनगर व चोपडा अशा दोन्ही ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.