जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

  जळगाव- जिल्ह्यातील विविध एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी काही ग्रामपंचायतीच्या गावी सेविका व मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यासाठी स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पारोळा तालुक्यातील धाबे, तांबोळे, रत्नापिंप्री, पिंपळकोठा, पुनगांव, चोरवड, सुमठाणे येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका, खेडीढोक येथे मिनी अंगणवाडी सेविका तर गडगाव येथील मदतनीस पदासाठी अर्ज मागणविण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यातील धुपी, बामणे, पाडसे, गांधली, गलवाडे खु,, वासरे, आर्डी, अंचलवाडी, शिरसाळे खु., दापोरी बु, रुंधाटी, इंदापिंप्री, पिंपळे बु. येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर भडगाव तालुक्यातील सावदे येथील दोन व देव्हारी येथील एक अंगणवाडी पदासाठी तर नावरे व महिंदळे येथील प्रत्येकी एका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्जदाराचे वय दि. 31 जानेवारी, 2021 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 30 वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास 2 अपत्याचेवर अपत्य नसावीत. दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देणार नाही याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, अर्जदार महिला असावी, अर्जदार स्थानिक रहिवाशी असावी (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक पात्रता सेविकेसाठी किमान दहावी पास ते उच्चतम तर मदतनीस साठी किमान सातवी पास ते उच्चतम असावी.

अर्ज कार्यालयाने वितरीत केलेला व विहित नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा तहसिलदार यांचा दाखला असावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 10 गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असावा. (एस.सी/एस.टी/व्ही.जे.एन.टी/ओबीसी/एस.बी.सी), मागासवर्गीय उमेदवारास 1) एससी व एसटी साठी 10 गुण 2) व्ही.जे.एन.टी/ ओबीसी/एस.बी.सी साठी 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. 12 वी नंतर अर्जदार पदवीधर/ङि एड/बि.एड केले असल्यास अतिरिक्त 5 गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित व खाजगी संस्थाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही, रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास तसा बदलाबाबत व भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आहे,

अर्ज विक्री व स्विकृती 1 ते 12 फेब्रुवारी, 2021 पर्यंत असून अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. 12 फेब्रुवारी पर्यंत राहिल. शासकीय सुट्टीचे दिवशी अर्ज विक्री वा स्वीकारणे बंद राहिल, शैक्षणिक पात्रेतसंबधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत व त्या प्रमाणपत्रांना गुणदान करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र नंतर स्वीकारले जाणार नाही. मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असावी, अर्जासोबत इ. 7 वी चे गुणपत्रक जोडावे. तसेच पुढील शिक्षण झाले असल्यास त्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडावेत. असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पारोळा, अमळनेर, भडगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.