जिल्हा दूध संघाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

0

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची गुरूवारी 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर झाले. सहकार क्षेत्रातील या प्रकल्पाने गेल्या 50 वर्षाच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले. मध्यंतरीच्या काळात दूध संघ डबघाईस आला होता. 5 वर्षापूर्वी लोकशाही पध्दतीने संचालक मंडळाची निवडणूक होऊन एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय पॅनेल सत्तारुढ झाले. दूध संघाच्या चेअरमनपदी सौ. मंदाताई खडसे यांची निवड झाली.

गेल्या पाच वर्षात दूध संघ सातत्याने नफ्यात असून ऑडिटरचा ‘अ’ वर्ग दर्जा कायम ठेवला आहे हे विशेष होय. गेल्या दिड वर्षापासून कोरोनाचे आणि लॉकडाऊनचे संकट असतांना सुध्दा संघाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दूध संकलन वाढले परंतु त्या मानाने दुधाची विक्री वाढली नाही. परंतु उरलेल्या दुधाचे संघातर्फे अनेक उपपदार्थ बनवून त्याची विक्री करून वाढलेल्या दूध संकलनाची भर भरून काढली. गेल्या पाच वर्षात संघात 91 कोटी रूपयांची कामे केली गेली. त्यामुळे कालबाह्य झालेल्या काही मशिनरी बदलण्यात आल्या. त्यामुळे संघाच्या उत्पादन प्रक्रिया क्षमतेत वाढ झाली.

आता 35 वर्षापूर्वी उभारण्यात आलेला संघाचा पशुखाद्य कारखाना आणि दुध प्रक्रिया प्रयोग शाळेची मशिनरी कालबाह्य झाले असून ती मशिनरी बदलून नवीन मशिनरी घेण्याचा निर्णय संघाने घेतला असून तो ठराव सुध्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मंजूर केला. याचा अर्थ नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता संचालक मंडळ आणि दूध उत्पादक संस्था सदस्यांची आहे ही विशेष बाब म्हणता येईल. संघाचे भाग भांडवल 1502 कोटी रूपये इतके आहे. आणखी भागभांडवल वाढवून संघाची मजबुतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. चांगल्या भाग भांडवलामुळे संघाला दुसऱ्यांच्या कर्जावर अवलंबून राहता येत नाही. कर्जाच्या व्याजाच्या बोजाखाली कोणतीही संस्था जेरीस येते. तशी अवस्था आज दूध संघाची नसल्याने एक चांगले निदर्शन म्हणता येईल.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात निर्माण करण्यात येणाऱ्या दूधाच्या उपपदार्थाला जिल्ह्याबाहेर  महाराष्ट्रात चांगली मागणी आहे. उपपदार्थांच्या विक्रीतून मोठा नफा प्राप्त होतो. नफा प्राप्त झाला की त्या नफ्यातील हिस्सा डिव्हीडंच्या रुपाने दूध उत्पादकांना देता येते छोट्या दूध उत्पादक संस्थाना ते डिव्हिडंट सहाय्यभूत ठरते. दूध उत्पादक संस्थांना त्यांच्या घरापर्यंत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा संघ प्रयत्न करत आहे. ही जमेची बाजू म्हणता येईल.

जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील दोन प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांची बँक असलेली जळगाव जिल्ह्या मध्यवर्ती सह. बँक आणि जळगाव जिल्ह्यासह दूध उत्पादक संघ होय. सहकार क्षेत्रातील हे दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. विशेष म्हणजे सहकार क्षेत्रातील हे दोन्ही प्रकल्प पाच वर्षापूर्वी आर्थिक डबघाईची स्थिती होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात या दोन्ही संस्था नफ्यात आल्या असून दोन्ही प्रकल्पांना अ वर्ग ऑडिटरचा दर्जा मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक आणि जिल्हा दूध संघाने नाथाभाऊच्या अनुभवाचा चांगलाच फायदा होतो आहे हे मान्य करावेच लागले. सहकारात राजकारण नको ही नाथाभाऊंची भूमिका आता सर्वांना मान्य होत आहे.

सहकारी संस्थात राजकारण्यांनी आपले राजकीय जोडे बाहेर काढून संस्थेच्या हिताचे होऊ शकते हे एकनाथराव खडसेंनी जिल्हा सह. बँक आणि जिल्हा सह. दूध उत्पादक संघात दाखवून दिलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपसह सर्वपक्षीय पॅनल तयार होण्याच्या मार्गावर आहे. दूध संघाची निवडणूक सुध्दा सर्वपक्षीय पॅनलचा फॉर्म्युल्याने लढविली जाईल. यात शंका नाही. सहकारात राजकारण विरहित व्यवस्थापन असले तर अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेता येवू शकणार हे नाथाभाऊंनी दाखवून दिले आहे. सहकारातील या दोन्ही प्रकल्पात राजकारण विरहित व्यवस्थापन यापुढे सुध्दा कामकाज करेल हीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.