जळगाव वराहमुक्तचा दावा फोल

0

जैनाबाद, शिवाजीनगर परिसरात झुंडी; आरोग्याची हेळसांड, पोलिसांची डोळेझाक 

जळगाव -शहर वराहमुक्त असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. मागे प्रशासनाने शहर वराहमुक्त केले होते. मात्र सध्या जैनाबाद, शिवाजी नगर आदी भागात डुकरांच्या झुंडीच्या झुंडी आढळत आहेत. वराहांची संख्या इतकी वाढली आहे की परिसरातून अबालवृद्धांना चालणे मुश्किल झाले आहे. बालकांच्या हातातील खाऊमुळे डुकरे त्यांच्यावर हल्ला करु शकतात.
अधिनियमानुसार वराह मारता येईल?
कोणत्याही जागेत जनावरे पाळणे हे नागरिकांना उपद्रवी ठरत असेल, स्वच्छतेच्या कारणावरुन त्यास हरकत घेता येईल. कोणतेही वराह भटकताना आढळल्यास त्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार प्रशासनास आयुक्तांच्या निर्देशाने ताबडतोब मारुन टाकता येईल. त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल. अशा प्रकारे मारलेल्या वराहाच्या भरपाईबाबत कोणताही दावा करता येणार नाही, असे अधिनियमात नमूद आहे. परवानगी देण्यात आलेल्या जनावरांच्या संख्येपेक्षा अधिक जनावरे बांधण्यास मनाई आहे. राहत्या घरात जनावरे बांधण्यात मनाई आहे. आयुक्तांच्या लेखी परवानगी शिवाय चतुष्पाद जनावरेही पाळण्यास मनाई आहे.
साथीच्या रोगांच्या प्रादूर्भावाची शक्यता
वराहांमुळे शहरात साथीचे रोग वाढीस लागण्याची शक्यता आहे. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असल्याने साथीचे रोगात वराहांमुळे भर पडू शकते. स्वाईन फ्लू, डेंगू, चिकुन गुनिया आदी रोगांचा फैलाव होऊ शकतो.

आरोग्य अधिकारी अनभिज्ञ

शहरातील या जटील समस्येबाबत आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना संपर्क साधला असता सदरील कामाचा अतिरिक्त पद्भार आपणाकडे नसून डॉ. विकास पाटील यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विकास पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी सदर विषयाची फाईल ही आरोग्य विभागातच श्री. पाखले यांच्याकडे असल्याचे सांगितले. श्री. पाखले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याचे समजले. दोन्ही अधिकार्‍यांच्या पदभाराच्या हद्दीच्या वादात मात्र शहरातील आरोग्याची हेळसांड होत आहे.

शहर हगणदारीमुक्त कसे?

मोकाट चरणारे वराह शहरात असताना शहर हगणदारीमुक्त कसे म्हणता येईल? सार्वजनिक शौचालयांजवळही वराहांचा उपद्रव वाढला आहे. शौचालयातही जाणे अबालवृद्धांना कठीण जात आहे.

कोटेशन तयार आदेश बाकी

वराहांवरील कारवाईसाठी मनपाने कोटेशन काढले आहे. प्रत्येक वराहामागे 50 रु. असा दर आहे. संबंधिताने ती पकडून त्यांची विल्हेवाट स्वत: लावायची आहे. कोटेशन धारकांना बोलावून कमी दराचे कोटेशनला मंजूरी देवून कार्यादेश देण्याचे काम तेवढे बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.