जळगाव, भुसावळ आणि अमळनेरात उद्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार

0

जळगाव (प्रतिनीधी) : जळगाव, भुसावळ आणि अमळनेर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ७ जुलैपासून ते १३ जुलै जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन लागु केला होता. दरम्यान, हा लॉकडाऊन आज संपल्यानंतर याला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची महत्वाची घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. यामुळे उद्यापासून या तिन्ही शहरांमध्ये शासकीय नियमांसह अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते. त्याच प्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील.
जळगाव तसेच भुसावळ व अमळनेर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या तिन्ही शहरांमध्ये सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. यात अगदी किराणा सारख्या अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. तिन्ही शहरांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे खरोखर लॉकडाऊनच्या नियमांचे बर्‍यापैकी पालन करण्यात आले. दरम्यान, आज सोमवारी लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्याने आता याला मुदतवाढ मिळेल की, अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमिवर, जळगाव, भुसावळ व अमळनेरात मंगळवार दिनांक १४ जुलै पासून शासकीय नियमांच्या अधीन राहून अनलॉक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

केंद्र व राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या नियमांच्या आधारे जळगाव, भुसावळ व अमळनेरात व्यवहार पूर्वपदावर येण्यास मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. जळगाव शहरातील व्यापारी संकुलांमध्ये दुकाने खुलण्याचा मार्ग काही दिवसांपूर्वीच मोकळा झालेला आहे. तथापि, याबाबत आता स्थानिक महापालिकेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यामुळे महापालिका आता शॉपींग कॉम्प्लेक्स मधील दुकानदारांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

सक्तीच्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनाचे चक्र अक्षरश: थांबले असून यामुळे अर्थव्यवस्थाही ठप्प झालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, मंगळवारपासून जळगाव, भुसावळ व अमळनेरात मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी देखील अनलॉकची प्रक्रिया क्रमाक्रमाने सुरू होणार आहे. दरम्यान, तीन शहरांमधील लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढे ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते. त्याच प्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.