जळगाव पुन्हा अतिक्रमणयुक्त शहर

0

अतिक्रमण संवर्धन, संरक्षण विभाग असे नामकरण करा

नितीन लढ्ढा यांची स्थायी समिती सभेत टीका

जळगाव – जळगाव शहरात फुले मार्केट, शिवाजी रोड येथे अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्यामुळे जळगाव शहर हे अतिक्रमणयुक्त शहर झाले आहे. तर अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण संवर्धन व संरक्षण विभाग असे नामकरण करा, अशी टीका शिवसेनेचे नगरसेवक माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी स्थायी समिती सभेत केली.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आचारसंहितेमुळे 11 मार्च रोजी रद्द झालेली सभा दि. 15 रोजी दुपारी 12 वा. सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेत प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, लेखाधिकारी संतोष बाऊळे, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.सभेत आयत्या वेळच्या विषयांवरच चर्चा झाली. विषयपत्रिकेवरील लिफ्ट वगळता सर्व विषय चर्चेविनाच मंजूर करण्यात आले.
शहरातील फुले व्यापारी बाजारपेठेतील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची भूमिका काय? असा सवाल विचारत नितीन लढ्ढा यांनी याबाबत तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व चंद्रकांत डांगे यांनी चोख कामगिरी बजावली होती. आपण आस्थापनेवर एवढा खर्च करतो. अतिक्रमण हटविण्यास लाखो रुपये खर्च करुन पोलीस बंदोबस्त मागवतो. मात्र 15 व्या मिनिटाला अतिक्रमण जैसे थे होते. प्रभाग क्र.5 मधून जर आयुक्तांची चारचाकी गेली तर आपल्या पदाचा राजीनामाच देईन, असे आवाहनच त्यांनी केले. फेरीवाल्यांसाठी ख्वाजामिया परिसर व सानेगुरुजी रुग्णालयाची मनपाची जागा उपलब्ध आहे. मात्र तिथे न बसता विक्रेते आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. रस्ते हे केवळ रहदारीसाठीच हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अकार्यक्षम कर्मचार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती- आयुक्त
मनपा कर्मचार्‍यांत काम करण्याची प्रवृत्ती नाही. त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ज्या कर्मचार्‍यांची वयाची 55 वर्षे पुर्ण केली आहेत. ज्यांना महानगरपालिकेच्या सेवेत 30 वर्षाहुन अधिक काळ झाला आहे. मात्र ते काम करण्यास सक्षम नसतील अशा अकार्यक्षम कर्मचार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती देणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. टेकाळे यांनी घेतल्याचे सभेत जाहीर केले.
लिफ्टच्या विषयावर बोलताना नितीन लढ्ढा यांनी  निविदा स्वीकारणार्‍या दोन कंपन्या या अनोळखी आहेत. 20 वर्षपूर्वी ज्यांनी लिफ्टचे काम केले त्या चांगल्या सर्व्हिस देणार्‍या दर्जेदार कंपन्या होत्या, अशी माहिती दिली.
विद्युत विभागाला धरले धारेवर
मनपाच्या विद्युत विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत नितीन लढ्ढा, नितीन बरडे व विष्णू भंगाळे यांनी विभागाला धारेवर धरले. बी. जे. मार्केटला इलेक्ट्रीक वायरचा विळखा पडलेला आहे. तेथे रहिवास आहे. नुकतीच तेथे आग लागली होती. मात्र उपाययोजना नव्हत्या. थोडक्यात निभावले नाहीतर मार्केट खाक झाले असत, याची जबाबदारी कोणाची? मेंटनन्स कोणाकडे? असा सवाल विष्णू भंगाळे यांनी विचारला.
घटनेची वाट पाहू नका- आयुक्त
अशा गंभीर स्वरुपाच्या प्रकरणात लक्ष घाला घटनेची वाट पाहु नका. कर्मचारी काम करतात मात्र का करतात हेच त्यांना कळत नाही. हेतू विचारात घेणे आवश्यक आहे. विभाग प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारावी, अशा सूचना डॉ टेकाळे यांनी दिल्या. तर सुप्रिम कॉलनीला12 दिवस तर काही ठिकाणी 22 दिवस पुरवठा होत नसल्याचा प्रश्न उपस्थित करुन नितीन लढ्ढा यांनी 25 लाख भरुनही नागरिकांना समाधान नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मू. जे. महाविद्यालय परिसरात 40 लाईट बंद आहेत, अशी माहिती नितीन बरडे यांनी दिली.
श्रीराम मंदिर ते कोर्ट चौक रस्त्यावर अंधार
श्रीराम मंदिर ते कोर्ट चौक रस्त्यावरील 40 लाईट बंद आहेत. त्यामुळे परिसर अंधारात आहे. याविषयावर चर्चा होवूनही काम मार्गी लागत नसेल तर सर्व शहराचे लाईट बंद ठेवा, असा मुद्दा विष्णू भंगाळे यांनी उपस्थित करत विभागाला धारेवर धरले. भोईटे शाळेत जि.प. शाळेचे दहावीचे वर्ग भरत असल्याने दोन वर्गाअभावी शाळेची दुरुस्ती खोळंबल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले.
समांतर रस्त्यांना पोल शिफ्टींगचा अडसर
समांतर रस्त्यांचे काम दोन फेसमध्ये करण्यात येणार आहे. 141 कोटीचा हा प्रकल्प आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने पोल शिफ्टींगचे काम मनपा करु शकणार नाही. एमएसइबीनेही आर्थिक बाजू उपस्थित करत शिफ्टींगला नकार दिला आहे. तर खासदार उन्मेष पाटील यांनी बैठकीत डीपीडीसीकडून मिळणार असल्याचे सांगितले होते मात्र डीपीडीसीनेही नकार दिल्यानंतर पोल शिफ्टींग नसल्यास प्रकल्प 69 कोटीचाच राहणार असल्याची माहिती लढ्ढा यांनी दिली.
सभापतींचे वृक्ष लागवडीचे आवाहन
25 हजार झाडे मनपाकडून 147 जागांवर लावण्यात येणार असून सर्वांनी सहभागाचे आवाहन सभापती जितेंद्र मराठे यांनी केले. तर प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. टेकाळे यांनी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर नगरसेविकांच्याहस्ते त्यांच्या प्रभागात वडाची झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.