मंत्रिमंडळाचा विस्तार ! ‘या’ नेत्यांना मिळू शकते संधी

0

मुंबई : राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. रविवारी, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे.

दरम्यान या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, कोणते नवे चेहरे असणार तर, कोणाला डच्चू मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.  यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय संजय कुटे, परिणय फुके यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे.

या पाच जणांना डच्चू?
मंत्रिमंडळ फेरबदल करताना भाजपमध्ये काही जणांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या पाच दिग्गजांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली पालकमंत्री अंबरीश आत्राम यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत कोण-कोण राजीनामा देणार? याकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.