जळगावातील कंडक्टरच्या आत्महत्येनंतर गिरीश महाजन भडकले….म्हणाले

0

जळगाव : वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून जळगावातील एसटी महामंडळातील वाहक (कंडक्टर) मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, यानंतर, जळगावचे भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

सरकार गेंड्याच्या कातडीचं असून कुठल्याच संवेदना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितलं की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही, असे म्हणत माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भेटायला तयार नाहीत. तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. असं सरकार चाललंय. राज्यातील सर्वच वर्गात तीव्र नाराजी असून सरकार कोण चालवतंय, कुणाचंय काहीच समाजायला मार्ग नाही. आज, एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं आहे, घरातील कमावता माणूस निघून गेल्यानं मोठं संकट कुटुंबीयांवर कोसळलंय. मात्र, सरकारला जाग येत नाही, कुणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायला तयार नाही, सरकार संवेदनाहीन झालंय, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.