जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी

0

जळगाव : कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. सध्या जळगावमध्ये सोन्याचे दर 46 हजार 700 रुपये प्रतितोळापर्यंत खाली आले आहेत. जळगाव सराफ बाजारात शनिवारी सोन्याचे दर जीएसटी शिवाय 46 हजार 700 रुपये, तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 प्रतितोळा असे नोंदवण्यात आले .

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे, सोन्याची मागणी घटली आहे. स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत असल्याने जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.

असा राहिला आठवडा –

जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी (14 जून) सोन्याचे दर 48 हजार 345 इतके होते. त्यानंतर मंगळवारी (15 जून) सोन्याच्या दरात प्रतितोळा 253 रुपयांची वाढ झाल्याने दर 48 हजार 598 झाले होते. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 254 रुपयांनी खाली आल्याने 48 हजार 344 रुपये प्रतितोळा झाले होते. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा 1 हजार 200 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 100 रुपये असे होते. 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 48 हजार 378 रुपये होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सराफ बाजारात आर्थिक व्यवहारांना सुरुवात होण्यापूर्वीच सोन्याचे दर पुन्हा दीडशे रुपयांनी घसरले. शुक्रवारी सोन्याचे दर 46 हजार 940 इतके नोंदवले गेले. शनिवारी देखील सोन्याचे दर पुन्हा 240 रुपयांनी खाली आल्याने 46 हजार 700 इतके झाले. 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 असे होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.