जळगावमध्ये घरबांधकामात मनपाचा अडसर

0

जळगाव (प्रतिनिधी) : महानगर पालिकेच्या उदासिनतेमुळे जळगावमध्ये घरबांधकामात अडचणी येत आहेत. घराचे स्वप्न पहाणारे चातका प्रमाणे मनपाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाद्वारे बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या वर्षभरात बांधकाम परवानगीसाठी नगररचना विभागाकडे 1151  प्रस्ताव प्राप्त झालेत.  त्यापैकी 657  प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 14 प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेत तर 480 प्रस्ताव प्रलंबित आहेत. नगररचना  सहाय्यक संचालक आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. मनपाचे नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे सेवानिवृत झाल्यामुळे महापालिकेत सहाय्यक संचालक नगररचना पदाचा पदभार सुखदेव पवार यांच्याकडे आहे.

तर सहाय्यक नगररचनाकार सोनवणे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. पवार यांच्याकडे जालना आणि सोनवणे यांच्याकडे जिल्हा नगररचना विभागाचा पदभार आहे. त्यामुळे परवानगी प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याचे चर्चेत आहे. मनपात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने गेल्या वर्षभरातील अनेक बांधकाम परवानग्यांचे प्रस्ताव कारवाईअभावी प्रलंबित आहेत. वर्षभरात मनपा नगररचना विभागात ऑनलाईन पध्दतीने आलेल्या 1151 फाईलींपैकी 480 फाईली प्रलंबित असल्याने नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बांधकामसह परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रे यासह इतर परवानग्यांसाठी येणारी प्रकरणे प्रलंबित आहेत. महापालिकेत नगररचना विभागाचे कामकाज ऑनलाईन करण्यात आले असले तरी मुख्य  मंजुरीसाठी सहाय्यक रचनाकरांच्या स्वाक्षरीशिवाय मंजुरी मिळत नाही. त्यामुळे पुर्णवेळ अधिकार्‍यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा  व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.