जळगावचा पारा ४७ अंशांच्यावर

0

जळगाव ।  मागील दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे राज्यासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा कमालीचा चढला आहे. जिल्ह्यातील  शुक्रवार दि.26 रोजी बोदवड व चाळीसगाव तालुका वगळता सर्वत्र 46 अंशांच्यावर तापमानाची नोंद करण्यात आली. त्याचवेळी जिल्ह्यातून गेलेल्या महार्गावर तर हा पारा 47.8 पर्यंत पोहचल्याने आगामी दोन दिवसात 50 तर पार करणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

वेधशाळेने राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची सूचना याआधीच दिली होती. त्यामुळे नागरिकांनीदेखील आपापल्यापरीने काळजी घेतली असली तरी तापमानाचा पारा मात्र चांगलाच वाढल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात 43 तर चाळीसगाव तालुक्यात 40 अंश तापमानाची नोंद झाली. हे दोन तालुके सोडले तर सर्वत्र तापमान 46 अंशाच्यावरच राहिले. याचवेळी महामार्गावर हा पारा 47 अंशापर्यंत पोहचला. काहीठिकाणी तर 47.8 तापमानाची देखील नोंद झाली. त्यामुळे मे-हीटचा तडाखा एप्रिलमध्येच सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.