जय किसान बाजार समितीचे आरोपीशी लागेबांंधे ?

0

गणेश भेरडे, खामगाव

लोकशाही न्यूज नेटवर्क

नाफेड हरभरा चोरी प्रकरणात माल खरेदी करणाया जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समितीला पोलीसांनी अर्थपूर्ण व्यवहारातुन अभय दिल्याची चर्चा होत असतांनाच आरोपीशी लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. तर एका आरोपीने मागील वर्षीही या बाजार समितीला शेतमाल विकला होता, अशी माहिती पोलीस तपासातुन नव्हे तर चर्चेतुन समोर आली आहे.

शहरालगतच्या वरखेड खुर्द शिवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामामधून १ ते २ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान नाफेडचा सुमारे ५ लाखाचा १७५ कट्टे (८७ क्विंटल ५० किलो) हरभरा चोरीला गेला होता. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासा दरम्यान ४ जानेवारीला विठ्ठल मेहंगे व विशाल भटकर रा. शेगाव या दोन आरोपींना अटक केली. सोबतच चोरी गेलेला माल, गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा ७०९ व मोबाईल असा एकुण ११ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाकडून पीसीआर व नंतर एमसीआर मिळाला आहे.

मात्र या प्रकरणात चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीसांनी अभय दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे. या प्रकरणातील आरोपी विठ्ठल मेहंगे याने मागील वर्षीसुद्धा या बाजार समितीला शेतमाल विकल्याची चर्चा होत आहे. तर सदर प्रकरणाचा अर्थपूर्ण व्यवहारातून हाताळत तपास करण्यात आला असल्याचा आरोप होत आहे.

वास्तविक पाहता या बाजार समितीमध्ये निलकमल ट्रेडर्स, राजमाता ट्रेडर्स, रवि इंडस्ट्रीज व शिया एन्टरप्राईज अशा ४ फर्म असल्याचे समजते. यापैकी कोणीतरी माल विकत घेतला असेलच. चोरीचे वाहन जप्त केले पण वाहन चालक मालकाचे काय? एवढ्या मोठ्या मालाची चोरी फक्त दोघेच करु शकतात काय? असे एक ना अनेक प्रश्न याप्रकरणी उपस्थित होत असून ते सध्यातरी अनुत्तरीत आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या बाजार समितीतील मुख्य व्यापारी (संचालक) ३-४ दिवस भूमिगत झाला होता. प्रकरण निस्तारल्यानंतरच त्याने सुटकेचा श्वास घेतला. एकंदरीत या चोरी प्रकरणाच्या तपासात फार मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.