चोरी चोरी…चुपके चुपके व्यवसाय करणाऱ्यांवर मनपाची कारवाई

0

जळगाव ( प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढले आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही जळगावातील काही प्रतिष्ठित सराफ दुकानदार आणि इतर व्यवसायिकांनी लॉक डाऊन उल्लंघन केल्याचे आज उघड झाले. महानगरपालिकेने आज नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा ज्वेलर्ससह १२ दुकानांना सील करण्यात आले. मनपा पथकाच्या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे स्वतः इतरांचेही जीवन धोक्यात घालणाऱ्या या स्वार्थी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त बंदचे आदेश आहेत. तरीही देखील काही व्यवसायिक शटर अर्धे उघडून व्यवसाय करीत असताना निदर्शनास आल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करत 12 दुकाने सील केले. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत असतानाही काही व्यवसायिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. काही दिवसापूर्वी मनपा प्रशासनाने दाणाबाजारातील सहा दुकाने सील केले होते. तसेच काही जणांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथकाने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सुभाष चौक, सराफ बाजार, फुले मार्केट परिसरात पाहणी करत असताना काही व्यावसायिक शटर अर्धे उघडून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 12 दुकाने सीलची कारवाई करण्यात आली.

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही नियमांचे पालन होतांना दिसून येत नाही. शहरात पाहणी केली असता काही व्यावसायिक ांची प्रतिष्ठाने खुली दिसून आलीत. त्यामुळे सीलची कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ‘लोकशाही’ सोबत बोलताना सांगितले.

सील केलेल्या दुकानांची नावे
निर्मल ज्वेलर्स, डि.एस. प्लाझा कॉम्प्लेक्स मधील दोन दुकाने सीसीटिव्ही शॉप, आरती ज्वेलर्स, नंदुरबार ज्वेलर्स, बाविस्कर ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स, भारत हार्डवेअर, कन्हैय्या अगरबत्ती एजन्सी, पुरोहित स्टेशनरी, उध्दव ट्रेडर्स, एच.टी.स दिकोर यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.