चाळीसगाव तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची हायटेक कंपनी कडून फसवणूक

0

चाळीसगाव – शेतकऱ्यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात बोगस खतांचे रॅकेट आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणल्यानंतर आता मात्र काही बियाणे कंपन्या या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस येत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांना हायटेक कंपनी मार्फत बोगस ज्वारी बियाण्याच्या पिकाला ५ ते १० टक्के प्रमाणातच दाणे लागल्याच्या वाढत्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

बोरखेडा बु, उंबरखेड, खरजई व इतर गावातील शेतकऱ्यांनी हायटेक कपंनीचे ज्वारी वाण 3201, 3206 याचे या रब्बी हंगामात स्थानिक कृषी केंद्रांमार्फत बियाणे खरेदी केले होते.  मात्र या बियाण्यांची उगवण पुर्ण व्यवस्थीत झाली पण कणसांना धान्याचा भरणाच न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले.

आमदार चव्हाण यांनी तालुका कृषी अधिकारी साठे साहेब व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव साहेब व तालुक्यातील कृषी केंद्र चालक यांच्यासोबत खरजई शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाची पाहणी केली. यावेळी खरजई गावाचे उपसरपंच डॉ.प्रशांत एरंडे, भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष वाय आर सोनवणे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील माळी, कैलास पाटील, शेतकरी दिगंबर पाटील, सुनील पाटील, सुखदेव पाटील, वसंत कदम, संदीप एरंडे, प्रल्हाद शेजवलकर आदी उपस्थित होते.

त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की कागदपत्रे फिरवत कायदेशीर कचाट्यात शेतकऱ्यांना न अडकवता सदर पिकांचे पंचनामे करून पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन संबंधित हायटेक कंपनीवर गुन्हे दाखल करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे निर्देश कृषी अधिकारी यांना दिले.

बोगस बियाणे कंपण्यांच्या लॉबीचे हात वरपर्यंत पण शेतकऱ्यांसाठी प्रसंगी राजकीय किंमत मोजायला तयार –  आमदार मंगेश चव्हाण

मागील वर्षी बोगस खतांचा साठा सापडल्यानंतर मी राज्याचे गृहमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे तक्रार करत हे मोठे रॅकेट असून त्याच्या मुळापर्यंत जाण्याची मागणी केली होती. त्यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र त्यानंतर काही कारवाई झाली नाही उलट ज्या अधिकाऱ्यांनी हा बोगस खतांचा साठा पकडला त्यांना त्रास देण्यात आला. बोगस खते व बोगस बियाणे यामध्ये मोठ्या कंपन्या व मोठ्या व्यक्तींचे लागेबांधे असल्याने ते शेतकऱ्यांना फसवतात व त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र मी या बोगस बियाणे प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असून त्यासाठी मला राजकिय किंमत मोजावी लागली तर शेतकऱ्यांसाठी मागे हटणार नसल्याची भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली आहे.

उत्पादन खर्च सुद्धा पदरी पडणार नाही, खरजई येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली व्यथा

चांगला भाव व जनावरांसाठी चारा मिळत असल्याने मोठ्या अपेक्षेने आम्ही यावर्षी ज्वारीची लागवड केली. आतापर्यंत ३५ ते ४० हजार रुपये खर्च आला आहे. सुमारे दिडलाख उत्पन्नाची अपेक्षा होती मात्र ज्वारीच्या कणसाला १० टक्के सुद्धा दाणे न लागल्यामुळे २० हजारांचे सुद्धा उत्पन्न येणार नाही. अजून ज्वारी कापणी, खुडणी, काढणी यासाठी १० हजार खर्च येईल. आमचे वर्षच वाया गेल्याने झालेली नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी व्यथा खरजई येथील शेतकरी सुनील रामभाऊ पाटील व सुखदेव माधवराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली.

सर्व कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांसोबत – कृषी केंद्रचालक संघटनेची ग्वाही

हायटेक कंपनी च्या ज्वारी बियाणे मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून केवळ ५ ते १० टक्के दाणे एका कणसाला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या भरवशावर आम्ही व्यवसाय करतो मात्र अश्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही सर्व कृषी केंद्रचालक साक्षीदार म्हणून शेतकऱ्यांसोबत कायदेशीर लढाईत सोबत असल्याची ग्वाही पीक पाहणी प्रसंगी उपस्थित चाळीसगाव येथील वर्धमान कृषी केंद्राचे महेंद्र जैन यांनी कृषी केंद्र चालकांच्या वतीने दिली. यावेळी सुयोग कृषी केंद्राचे योगेश कुलकर्णी, जितेंद्र अग्रोचे निलेश कोतकर, विष्णू कृषी केंद्राचे राहुल ब्राम्हणकर, स्वामी समर्थ कृषी केंद्राचे सुरेश वाणी, सुलक्ष्मी कृषी केंद्राचे परेश जैन, न्यू पानाज कृषी केंद्राचे पंकज धामणे, विजय कृषी मंदिराचे मुरलीधर रावलानी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.