घरकुल प्रकरणात वाघूरची कागदपत्रे

0

शासनासह विजय पाटलांना सुप्रीमची कारणे दाखवा नोटीस

 

जळगाव दि.21-

घरकुल प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आला असताना यात वाघूर प्रकरणाचे दिशाभूल करणारे कागदपत्र सादर केल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे वकील अ‍ॅड. जितेंद्र निळे यांनी धुळे विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या घरकूल प्रकरणाला वेगळीच दिशा मिळेल का? अशी साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अ‍ॅड. जितेंद्र निळे यांनी दै. लोकशाहीशी बोलताना दिली.

वाघूर पाईपलाईन घोटाळा झाला असल्याची तक्रार विजय भास्कर पाटील व शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.  मात्र या प्रकरणात तथ्य नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी सदर प्रकरण बंद केले होते. त्यामुळे संबंधितांनी पोलिसांनी तपास योग्य केला नाही. न्याय मिळावा अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमुर्ती नलावडे यांच्याकडे सुनावण्या झाल्या. या प्रकरणी न्यायमुर्ती नलावडे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यावर ताशेरे ओढले. या न्यायालयात झालेला निर्णय, झालेल्या सुनावण्या यांचा घरकुलशी संबंध नसताना सरकारी वकील अ‍ॅड.  प्रवीण चव्हाण यांनी वाघूर प्रकरणी झालेले सर्व निर्णय सुनावण्या ह्या घरकूल प्रकरणात दाखल केल्या. दोघांचा वास्तविक अर्थाअर्थी संबंध नव्हता. सुरेश दादांच्या संदर्भात न्यायमुर्ती नलावडे यांनी ओढलेले ताशेरे धुळे न्यायालयात  घरकूल प्रकरणी दाखल केले ही बाब सुरेशदादा जैन यांचे वकील अ‍ॅड. जितेंद्र निळे यांनी दि. 21 रोजी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान न्यायमुर्ती नलावडे यांनी ओढलेले ताशेरेंविरुद्ध सुरेशदादा जैन यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. मुथरा यांच्यामार्फत सुप्रिम कोर्टात दाद मागितली. अ‍ॅड. मुथरा यांनी न्यायमुर्ती इंदिरा बॅनर्जी व संजीव खन्ना यांच्या खंडपिठाकडे सुप्रिम कोर्टात याचिका दाखलची विनंती केली. न्यायमुर्ती बॅनर्जी व खन्ना यांनी याचिका दाखल करुन घेत. दि. 20 रोजी महाराष्ट्र शासनासह विजय भास्कर पाटील, श्री. शेख यांना कारणे दाखवा नोेटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाचा याचिका दाखल करुन घेणे व कारणे दाखवा नोटीस सुरेश दादा जैन यांचे वकील अ‍ॅड. जितेंद्र निळे हे आज धुळे विशेष न्यायालयात कागदपत्रे दाखल करणार आहेत. गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.