गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा – पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्रजी शिंगणे

0

बुलडाणा, (जिमाका) 

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

स्थानिक विश्राम गृह येथे अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती विभागाचे सह आयुक्त अन्न एस. जी. अण्णापुरे , अकोल्याचे सहाय्यक आयुक्त एस.डी.  तेरकर, अमरावती व यवतमाळचे सहाय्यक आयुक्त  के. आर. जयपूरकर, बुलडाणा सहायक आयुक्त एस. डी. केदारे यांच्यासह विभागातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमरावती विभागात केलेल्या कारवायांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.  त्यानंतर अमरावती, अकोला, बुलडाणा येथील गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करून गुटख्याची मोठया प्रमाणात विक्री करत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले. परंतु आता याकडे दुर्लक्ष होता कामा नये, गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, अशा सूचना मंत्री श्री. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

तसेच जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न पदार्थ तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. खवा, मिठाई यामध्ये प्रामुख्याने भेसळ होत असते त्याची देखील तपासणी करण्यात यावी. काही व्यावसायिक खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करतात. सदर तेलामध्ये तळलेले खाद्यपदार्थ खाल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकाच तेलाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाही करावी. किराणा दुकानाच्या देखील नियमित तपासण्या कराव्या. यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाही करण्यात येईल असा इशारा मंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.