गप्पा इंडियाशी उपक्रमात श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गिर्यारोहक उमेश झिरपे

0

आशा फौंडेशन व रोटरी क्लब जळगाव वेस्टचा उपक्रम

जळगाव- आशा फौंडेशन व रोटरी क्लब जळगाव वेस्ट आयोजित गप्पा इंडियाशी या उपक्रमात श्रीशिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गिर्यारोहक उमेश झिरपे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सात अष्टहजारी शिखर मोहिमांचे यशस्वी नेतृत्व करणारे उमेश झिरपे एकमेव भारतीय गिर्यारोहण नेते आहेत. रोटरी क्लबच्या मायादेवी नगरातील रोटरी भवनात शनिवार, दि. १८ जानेवारी सायंकाळी ६ वा. होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब जळगाव वेस्टचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे व कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

उमेश झिरपे यांचा परिचय

व्यवसायाने कर सल्लागार आहेत. २०१२ साली त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर भारतातील सर्वात मोठ्या यशस्वी नागरी मोहिमेचे नेतृत्व केले आहे. एव्हरेस्ट पाठोपाठ इतर सहा अष्टहजारी शिखरांवर भारतीय तिरंगा झिरपे यांच्या नेतृत्वाखालील मोहिमांनी फडकविला. यात माऊंट ल्होत्से, माऊंट मकालू, माऊंट च्यो ओयु, माऊंट धौलगिरी, माऊंट मनालू व माऊंट कांचनजुंगा या शिखरांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये झिरपे यांनी नेपाळ मधील माऊंट मेरा या ६४७६ मीटर उंच शिखरावर एकट्याने चढाई केली आहे. त्यांनी ४० हुन अधिक हिमालयीन शिखर मोहिम व ८० हुन अधिक सह्याद्रीतील मोहिमा केल्या आहेत. लेखक म्हणूनही ओळख असलेल्या झिरपे यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केले असून त्यांचे ‘गोष्ट एका ध्यासाची – एव्हरेस्ट’ , पर्वतपुत्र शेर्पा व मुलांसाठी गिर्यारोहण (मराठी व इंग्रजी) पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील श्री शिवछत्रपती पुरस्कारासह राज्यस्तरीय गिरिमित्र गिर्यारोहण पुरस्कार, एबीपी माझा गौरव, पुणे फेस्टिव्हल, श्री कसबा गणपती, पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार, गिरिभूषण समाजश्री पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.