खाजगी क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेला शैक्षणिक संस्था जबाबदार

0

लोकशाही चर्चासत्रात चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

जळगाव प्रतिनिधी 27-

समाज, राष्ट्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी पिढी घडावी, अशी शिक्षण क्षेत्राकडून अपेक्षा असताना ते काम शैक्षणिक संस्था प्रमाणिकपणे बजावत नसल्याने खाजगी क्लासेसमध्ये जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. अवाजवी स्पर्धेमुळे लातूर सारख्या घटना घडत असल्याचा सूर लोकशाहीच्या कार्यालयात आयोजित मान्यवरांच्या चर्चासत्रात उमटला. चर्चासत्रात दीपस्तंभ संस्थेचे संचालक यजुवेंद्र महाजन, आयएनआयएफडी संस्थेच्या संगीता पाटील, आशा फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
आपले मत व्यक्त करताना यजुवेंद्र महाजन म्हणाले की, समाज म्हणून आपण कुठल्या स्तराला जात आहोत. आपण समृद्ध, सुसंस्कृत, सुशिक्षित समाज घडवत आहोत का? शिक्षण क्षेत्रात व्यवसाय आला . व्यवसाय यावा पण त्यात स्पर्धा आहे. अशा घटनांनी सर्वांनाच धक्का बसलाय. शिक्षण क्षेत्राला इंडस्ट्री म्हणून पाहणं त्यातून पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवणे. विद्यार्थ्यांनीही केवळ मार्क मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे यामुळे हे घडत आहे. परिक्षेत पहिला येणे, विशिष्ट क्षेत्रात प्रवेश याने समाजात पत प्रतिष्ठा प्राप्त होते असा गैरसमज आहे. त्यातून मार्क्स मिळविण्याची स्पर्धा यातील स्पर्धा गैर नाही मात्र मिळणारा पैसा व प्रसिद्धी यासाठी काहीही करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. याला आळा घालण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी आपण एकाच रेसमध्ये जात नाहीत ना? एकाच दिशेला जायचे एकच गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा त्यातूनच व्यवसायीकरण होते. इतर मार्ग ओस पडले आहेत. पद प्रतिष्ठा पैसा मिळवायचा की आनंद, समाधान मिळवायचे ह्याबाबत चिंतन होणे आवश्यक आहे. हा विचार कोणी करत नसून पैसा प्रसिद्धी कशी मिळेल, असे वातावरण सर्व दूर होते व त्यातूनच अशा घटनांची पुनरावृत्ती होच राहील. मूळात विचार व प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्याचे महत्व नसून सगळीकडे अशी अस्वस्थता आहे. सर्वांनी एकाच्याय मागे न धावता सर्वांनी अंतर्मुख होवून आपली आवड, काय जमतं याचा विचार करुन जीवन निवडलं पाहिजे. इतरांना काय वाटते याचा विचार न करता स्वत:ला काय वाटते याचा विचार करावा. मुलांमध्ये अवाजवी स्पर्धा रुजविली जात नाही याची शोध घ्यावा. विद्यार्थ्याने स्वत:चा शोध घेतला तर त्याच्या आवडत्या क्षेत्रात तो रमेल आनंदी असेल तर स्पर्धा करणार नाही. संस्थेची प्रगती ही करोडो रुपये, विद्यार्थी संख्या संपत्ती याने ठरत नसून स्वत:चा आनंद त्यातून मिळणारे समाधान यात असते. जगात अशी माणसं आहेत की त्यांनी संशोधन करुन पेटंट घेवून ठेवली आहेत ती आरामात बसून पैसा कमावतात आपण मात्र रॅट रेस निर्माण करुन ठेवली आहे. आपण मजुरासारखे, मुर्खासारखे राबराब राबतो. पैशासाठी राबायचे समाधानासाठी नाही. निर्मितीला प्रगती म्हणतात. सर्वांच भलं होत त्याला प्रगती म्हणतात. कोणाला मारून कधीच प्रगती होवू शकत नाही कोणाला मारून मागे टाकून आपण कधीच पुढे जावू शकत नाहीत. ही शिकवण भारताने जगाला दिली आहे. कोणाला दुखवून तुम्ही पुढे जावू शकणार नाही तर तुम्ही आनंदी तर सर्व आनंदी सर्व पुढे जातात. जगण्याचे शास्त्र आम्हाला शिकावं लागेल नाहीतर वारंवार असे होत राहील. अशा घटनांना शिक्षण क्षेत्रही वंचित नाही. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात प्रामाणिकपणे मार्गदर्शन करायला हवे. एखादी व्यक्ती जर कोर्सला योग्य नसेल तर त्याला तसे सांगता आलं पाहिजे याला म्हणतात या क्षेत्रातलं तारतम्य ठेवून वागणं. या क्षेत्रातली सेवासाधना आहे. आपण अंतर्मुख होवून आताच्या पिढीवर जर काम केले तर हा बदल आपल्याला वीस वर्षांनी दिसेल.
शिक्षणदानाच्या पवित्र क्षेत्रात घटना दुर्दैवी- संगीता पाटील
शिक्षणाचे दान दिले जाते शिक्षण क्षेत्रातील घडलेल्या घटना दु:खास्पद आहेत. शिक्षण क्षेत्राला आलेले व्यवसायाचे रुप यामुळे ही मनोवृत्ती निर्माण झाली आहे. याबाबत चिंतन गरजेचे आहे. यावर काम केले पाहिजे अशी मनोवृत्ती बदलण्यासाठी पालक, विद्यार्थी यांनी मनन, चिंतन, प्रबोधन करणे आवश्यक आहे. शहरात सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. स्पर्धा वाढली आहे पाल्याला मुंबई, पुण्यात पाठवायचे असेल तर पालकही हवे ते डोनेशन द्यायला तयार होतात. पालकांनी केलेली व्यवस्था पाल्याला माहित असते त्यामुळे तो फारसे अभ्यासात कष्ट घेत नाही. कोचींग क्लास वाल्यांचीही तीच मनोवृत्ती असते. डोनेशनमुळे गुणवंत विद्यार्थी तेथे नसतात. शिक्षण क्षेत्राला भावनात्मकतेने बघून येणार्‍या पिढीला घडवले पाहिजे. सर्व क्षेत्रात मनोवृत्ती बदलली पाहिजे. येणारी पिढी ही आपलेच अनुकरण करणार आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने समाजात वावरले पाहिजे.
वसुधेचे कल्याण साधणारी पिढी घडेल का?- गिरीश कुलकर्णी
निर्माणोके पावन युगमे हम चरित्र निर्माण न भुले स्वार्थ साधनेकी आंधीमे वसुधाका कल्याण न भुले या काव्यपंक्तीप्रमाणे स्वार्थ साधत असताना वसुधेचे कल्याण साधणारी पिढी निर्माण करणे ही शिक्षण क्षेत्राची मुळ जबाबदारी आहे. राष्ट्राविषयी कृतज्ञता बाळगणारी पिढी घडविणे ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी आहे. का जगाव, कसं जगाव? या प्रश्‍नांची उत्तरे शिक्षणाने दिली पाहिजे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला युवकांची उपस्थिती नगण्य असते. पुर्वीचे शिक्षण ते देत असे आज भौतिकतेच्या जगात जीवघेण्या स्पर्धेतून लातूरची घटना घडली आहे. शहरातील शतकोत्तर दोन संस्थांमधील उफाळलेला वाद दुर्दैवी आहे. देशाला आयआयटीच नाही तर सर्व क्षेत्रातील कुशल लोकांची आवश्यकता आहे. एकाच्या मागे धावल्याने स्पर्धा निर्माण होते. ताळमेळ हरवतोय. चांगला समाज, पिढी घडविण्यासाठी शिक्षणातील आवश्यक बदल घडवून आणले पाहिजे. आम्ही त्यासाठी कार्यरत आहोत.
काळ बदलला तंत्रज्ञान बदलले समाज बदलला का? क्लासमधून पोटार्थी होवू मात्र माणूस म्हणून घडू का? पालक- शिक्षक व विद्यार्थी यांना शिक्षण व शाळेतला ताळमेळ कळलेला नाही. शाळेत जावून मुलाने स्वत:ची ओळख करायला हवी. अनेक स्पर्धांत भाग घेवून आपला कल ओळखला पाहिजे. त्यामुळे त्यांना करियर निवडणे सोपे होईल. घोकंपट्टी करणारी मुले पुढे जावून ढेपाळतात. शिक्षण होते नोकरी व्यवसायात ते यशस्वी होत नाही त्यातून नैराश्यात जातात. अपेक्षेप्रमाणे जीवनात गोष्टी घडत नाहीत व वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे. हे मुलांना पटवून सांगितले पाहिजे. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तरुणांनी नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाने जुन्या नोकर्‍या नामशेष झाल्या असून नवीन कुशल व्यक्तींची आवश्यकता आहे. गुणवंताला परिस्थितीची अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.