कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी अँटी-कोरोना कापडाची निर्मिती

0

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरवरच अवलंबून न राहता, तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळी उपकरणे आणि वस्तूंचा शोध तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ लावत आहेत. त्यात आता कापड उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या सियारामने अँटी-कोरोना कापडाची निर्मिती केली आहे. हे कापड तयार करताना ‘कॉस्मेटिक बेस्ड केमिस्ट्री कोटिंग’चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जेव्हा विषाणू कपड्यावर बसेल, तो काही सेकंदात नष्ट होईल, असा दावा ‘सियाराम’चे सीएमडी रमेश पोद्दार यांनी केला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या लॅबमध्ये या कापडाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. अँटी-कोरोना कापड हे विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ते ९९.९४ टक्के प्रभावी ठरू शकतं.

२५ वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत असणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी हेल्थगार्ड यांच्या सहकार्यार्ने हे कापड विकसित करण्यात आले आहे. आपले शरीर ९० टक्के कपड्यांनी झाकलेले असते. विषाणू कपड्यांवर बराच काळ राहतात आणि तिथूनच शरीरातही प्रवेश करू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच, नैसर्गिक, उत्तम दर्जांचं आणि विघटनशील साहित्य वापरून हे कापड तयार करण्यात आले आहे. या कापडावरील प्रक्रिया केलेला थर पाण्यात विरघळणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.

लॉकडाऊननंतर हळूहळू व्यवहार सुरू होतील. सगळ्यांना घराबाहेर पडावे लागेल. त्यावेळी अँटी-कोरोना कापड उपयुक्त ठरू शकते. विषाणूंशी सामना करणे हा या कापडाचा मूळ उद्देश असला, तरी स्टाइल, टेक्स्चर यात कुठेही तडजोड केली नसल्याचेही सियारामने म्हटले आहे. अर्थात, हे कापड वापरतानाही मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची आग्रही सूचना कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.