काँग्रेसला धक्का देत सर्वोच्च न्यायालयाचा सचिन पायलट यांना दिलासा !

0

नवी दिल्ली : राजस्थानात मागच्या काही दिवसापासून सुरु आलेला सत्ता संघर्षाच्या वादामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. दरम्यान, हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सचिन पायलट यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे.

विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालायत आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने १९ आमदारांच्या नोटीसीवर २४ जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचबरोबर सचिन पायलट समर्थक आमदारांनीही कॅव्हिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी जोशी यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली.

न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने आदेश देताना अपात्रतेची नोटीस देण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय निर्णय देऊ शकते, असे स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विधानसभा अध्यक्ष जोशी यांची मागणीही फेटाळून लावली आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्यासह समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर काँग्रेसमध्ये या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.