कवयित्री बहिणाबाईंचा गौरव

0

विशेष संपादकीय *

मराठी साहित्य विश्‍वात ज्या व्यक्तींचे आदराने नाव घेतले जाते त्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आवर्जून उल्लेख केला जातो . खान्देशच्या मातीत जळगाव तालुक्यातील असोदा येथे शेतकरी कुटुंबात बहिणाबाईंचा जन्म 11 ऑगस्ट 1880 रोजी झाला .

त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा अशी सहा भावंडे होती . वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला होता . नथुजी आणि बहिणाबाईंना ओंकार, सोपान आणि काशी अशी तीन अपत्ये झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांचा मृत्यू झाला.अतिशय सामान्य परिस्थितीतल्या, एका अशिक्षित, शेतकरी कुटुंबातल्या स्त्रीच्या अंगभूत प्रतिभेचा आविष्कार म्हणजे त्यांची कविता आहे. त्या काळच्या साहित्यिक घडामोडींचा किंवा आधुनिक जाणिवांचा कुठलाही प्रभाव त्यांच्या कवितेवर पडलेला दिसून येत नाही. कुठल्याही साहित्यिक संस्कारांपासून दूर, स्वतःच्या आणि स्वतःभोवतीच्या माणसांच्या जगण्यात जन्मलेली, वर्‍हाडी खानदेशी बोलीतली बहिणाबाईंची कविता आहे. म्हणूनच या कवितेचं एक वेगळं असं स्वतंत्र विश्‍व आहे. तिला मौखिक परंपरेतल्या ओवी या प्रकाराचा बाज आहे. ग्रामीण भागातल्या दैनंदिन जीवनक्रमाशी बांधलेल्या साध्यासुध्या, कष्ट करणार्‍या कुटुंबात रमलेल्या पण स्वतःच्या नि इतरांच्या जीवनाकडे डोळसपणे पाहणार्‍या स्त्रीचं भावविश्‍व त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे. इतक्या महान कवयित्रीचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला देण्यात यावे अशी मागणी जनसामन्यातून अनेकवेळा व्यक्त झाली आहे . बहिणाबाई चौधरींचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे अशी मागणी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच होत होती . 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती . जळगाव,धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या शेक्षणिक विकासासाठी समावेश करण्यात आला होता . बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता विविध समाजीक ,राजकीय व शेक्षणिक संघटनांनी सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरली होती . यासाठी उमवीसमोर अनेकांनी आंदोलने देखील केली होती .अनेक राजकीय पुढाऱयांनीदेखील नाव देण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला होता . लेवा समाजाच्या पाडळसे येथे झालेल्या अधिवेशनातदेखील ठराव मंजूर करण्यात आला होता . अखेर जनमानसाचा रेटा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमविला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा विधानसभेत केली . त्यामुळे बहिणाबाई चौधरी यांचा खर्या अर्थाने विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन गौरव झाला असेच म्हणावे लागेल .

Leave A Reply

Your email address will not be published.