कर्नाटक त्रिशंकू; रस्सीखेच सत्तेसाठी

0

भाजपला ‘मॅजिक फिगरची हुलकावणी

 बहुमत सिद्ध करण्यासाठी मागितली आठ दिवसांची मुदत

बंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना काटशह देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.

काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपाने प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढवली आहे. कर्नाटकच्या निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाला ‘मॅजिक फिगर’ने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला. भाजपाला सत्तेचे गणित जमवणे तितकंसे सोपे नसल्याचे लक्षात येताच, काँग्रेसने जेडीएसकडे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला. कुमारस्वामींना थेट मुख्यमंत्रिपदाचीच ऑफर दिल्याने त्यांनीही लगेचच ती स्वीकारली.
२२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. यामध्ये भाजपाने १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त ७३ जागांवरच समाधान मानावे लागले. देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११२ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे.
काँग्रेसकडून जेडीेएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली असून सोनिया यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जेडीेएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जेडीेएसनेही ही ऑफर स्वीकारली असून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचं जाहीर केलं आहे. आज सायंकाळी काँग्रेस आणि जेडीेेएसचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तर येत्या १८ मे रोजी जेडीएस नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जेडीएसने स्पष्ट केलं आहे. गोव्याच्या धर्तीवरच राज्यपालांनी आम्हालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करावं, अशी मागणीही जेडीएसने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.