कंडारीच्या महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

0

भुसावळ (प्रतिनिधी): – तालुक्यातील कंडारी येथे गेल्या आठवङयापासून पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी चांगलीच पायपिट व त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच पाण्याची समस्या उद्‌भवत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवार १६ रोजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचा निषेध केला.तसेच लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावात नेहमीच पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते. जलशुध्दीकरण केंद्रातील वीज पंप वारंवार नादुरुस्त होत असल्याने पाणी पुरवठा सुद्धा सतत खंडीत होतो. ही समस्या नेहमीचीच झाली आहे मात्र ग्रामपंचायतीकडे अतिरीक्त वीज पंप देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे.कंडारी हे गाव तापी नदी काठालगत वसलेले आहे. तसेच सध्या नदीपात्रात मुबलक पाणी असूनही गावात पाणी मिळत नसल्याने महिलांना नदीवर धुणे, भांडी करण्यासाठी जावे लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी विहीरीवर, स्टॅण्डपोस्ट आदी ठिकानांवरून पाणी भरावे लागते. ही बाब नित्याची झाली असून, संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून पाणी पुरवठ्याची मागणी केली. .मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या .

Leave A Reply

Your email address will not be published.