ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.  काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातावर बांधले होते.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढे काम केले तेवढे कोणीही केले नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितलं. “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही,” असंही ते म्हणाले होते.

“मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यांवर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नसल्याचे सांगितले आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत. माझी भाजपविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्व किंवा प्रदेश कार्यकारिणीवर नाराज नाही. केवळ देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच भाजपला सोडचिठ्ठी देत आहे,” असं खडसे यांनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.