ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुण्याजवळ मोठा शस्त्रसाठा आढळला

0

पुणे :- पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील पिंपळवंडी गावात पाइप बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तलवारी, भाले, कोयता, चिलखत यासारखे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून एका स्थानिक व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्रसाठा सापडल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

राजाराम किसन अभंग (वय ६०, रा.अभंगवस्ती, पिंपळवडी, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. अभंग याच्या घरात इलेक्ट्रिक गन तसेच पाइप बॉम्ब बनविले असून तलवार, कोयता, दोन भाले आणि स्फोटक बनविण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. यानंतर अभंग यांच्या घरावर छापा टाकून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये ४ पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील एक्सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचा सिग्नल श्वानाने दिला आहे़ मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), २ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर (त्यात ४ इलेक्ट्रिक, ५५ नॉन इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिक स्वीच, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असे साहित्य जप्त केले आहे.

अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने २००३ साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी तो तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.