एल्गार परिषदेच्या प्रकरणात पोलिसांनी सत्तेचा गैरवापर केला, त्यांची चौकशी करणार

0

पुणे : एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. नक्षलवादावर पुस्तक घरात सापडलं म्हणून त्याला अटक केली. नक्षलवादावरची पुस्तकं माझ्याही घरात आहेत. आम्ही हे सर्व समजून घेत असतो. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.  पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशीही मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्यातील एल्गार परिषदेतून सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी अनेक लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. अनेकांना अटकही करण्यात आली होती. आजही त्यापैकी काहीजण न्यायालयीन लढाई लढत आहेत. शरद पवार यांनी या कारवाईबद्दलच शंका उपस्थित केली. ‘एल्गार परिषदेत दडपशाहीविरोधात आवाज उठवला गेला होता. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या गेल्या होत्या. विद्रोही विचारांच्या कविता वाचणं किंवा घरात नक्षलवादी साहित्य वाचणं, हा काही अटकेचा आधार होऊ शकत नाही. माझ्याही घरात नक्षलावादाशी संबंधित साहित्य आहे. वाचन करणाऱ्यांकडं अशी पुस्तकं असतात. याचा अर्थ ते नक्षलवादी आहेत असा होत नाही,’ असं पवार म्हणाले.

कुणीतरी दुसऱ्याने काढलेलं पत्रक एका व्यक्तीच्या घरात मिळालं म्हणून त्यांना अटक करण्यात आली. पी. बी. सावंत यांच्यासारख्या वरिष्ठ न्यायमूर्तींना हा सत्तेचा गैरवापर वाटतो आहे. म्हणूनच यावर कठोर कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन व्हायला हवं. या प्रकरणातील अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि त्याची चौकशी करावी ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार, असंही शरद पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.