एमआयडीसीतील कंपन्यांच्या हलगर्जीपणाची केली होती तक्र्रार

0

आ.सुरेश भोळे यांनी पाठविले होते पत्र
जळगाव, दि.9 –
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या गितांजली केमीकल्समध्ये झालेल्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. मात्र औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसून सांडपाणी व टाकाऊ पदार्थ उघड्यावर फेकले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी नोव्हेंबर महिन्यातच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला पत्र दिले असल्याचे आ.भोळे यांनी कळविले आहे.
जळगाव शहर एमआयडीसी परिसरात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कंपन्या आहेत. त्यापैकी अनेक कंपन्यांमध्ये विषारी वायू, केमीकल, अवजड यंत्र सामग्री यांच्याशी संबंधित कामकाज सुरू असते. धोकादायक काम करताना कर्मचार्‍यांच्या सुरक्षेविषयी अनेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन मंडळ आणि ठेकेदारांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत नाही. तसेच कंपनीतून बाहेर सोडल्या जाणार्‍या विषारी द्रव्यांवर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही, टाकाऊ पदार्थ देखील उघड्यावर टाकण्यात येतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवाला देखील धोका निर्माण होत असतो. याबाबत उद्योग राज्यमंत्री आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जळगाव विभाग यांच्याकडे लेखी तक्रार पत्र देण्यात आले होते. प्रशासनाने वेळीच त्याची दखल घेवून कारवाई केली असती तर आज झालेली घटना टाळता आली असती, असे आ.सुरेश भोळे यांनी सांगितले आहे.
केवळ नोटीस बजावल्या
जळगाव औद्योगिक विकास मंडळाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने एमआयडीसीत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या कंपन्यांना सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी नोटीसा बजावल्या होत्या. संबंधित विभागाने योग्य कारवाई करीत सातत्य राखले असते तर कर्मचार्‍यांना देखील सुरक्षिततेची हमी मिळाली असती, असे आ.सुरेश भोळे(राजूमामा) यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.