एक ऑक्टोबर स्‍वैच्छिक रक्तदान दिवस

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दान करण्यासाठी श्रीमंतीची आवश्यकता असावी हा एक मोठा गैरसमज असून, नानाविध अनेक दानात सर्वसाधारण व्यक्ती जे १८ वर्षापेक्षा पुढील व साधारण ५० किलो वजन असलेले कुणीही सारेच ,पिडीत रुग्णांना नवजीवन देण्यासाठी सहज रक्तदान सेवा कार्य करू शकतात. रक्तदान केल्याने आपल्याला कुठलाही त्रास किंवा अशक्तपणा येत नसतो, तसेच रक्तदान केल्यानंतर विशेष आहाराचीही आवश्यकता नसते जे आपण नियमित जे जेवण करतो जसं भाजी भाकरी खाणेही पुरेसे असत.

गंभीर अपघात, रक्तक्षय तसेच प्रसूत होणाऱ्या माता-भगिनी, थॅलॅसिमिया, हिमोफिलिया ,सिकलसेल,आजाराने ग्रस्त रुग्ण आदिंना सतत सुरळीत  रक्तपुरवठा अती आवश्यक असतो, कारण निसर्गाने दिलेल्या मानव शरीराच्या धमण्यात वाहणारे रक्त आजही शास्त्रज्ञ कुठल्याही संशोधन केंद्रात तयार करू शकले नाहीत.

तर जात पात लिंग भेदभाव विरहित विश्वातील सर्वात अमुल्य, अतुलनीय, प्रेरणादायी, परोपकारी सेवाकार्य असेल तर ते फक्त रक्तदानातच आहे. आपल्या शरीरात साधारण सात लिटर पर्यंत रक्त असते तर एका रक्तदान प्रसंगी आपण साधारण ३५० एम.एल. म्हणजे पाव लिटर रक्त आपण रक्तदान करताना देतो.  यामुळे फार असा कुठलाही त्रास आपल्या शरीरावर होत नाही तर अल्पावधीतच दिलेल्या रक्ताची झीज भरून निघते .रक्तदान केल्याने अतिशय ताजेतवाने स्फुर्तीमय वाटते.

आता अत्याधुनिक वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्या एका रक्तदानामुळे वेगवेगळे घटक तयार होत असल्याने एकाच केलेल्या रक्तदानातून आपण अनेकांचा जीव वाचवतो.

रक्तामध्ये आढळणारे रक्तग्रुप, बॉम्बे ब्लड ग्रुप ठराविक दात्यांचा असून त्यांची संख्या खूप मर्यादित आहे. तर मोठ्या प्रमाणात आपले साधारण रक्ताचे चार गट पडतात यात ए, बी, एबी, आणि  ओ असे चार गट  असून यात चार पॉझिटिव्ह आणि चार निगेटिव्ह असे प्रकार आहेत. सध्या नॅकस्टेडेड ब्लड सर्वाधिक सुरक्षित असून याचा वापर वाढल्यास पुढील होणारे मोठे संभाव्य धोके कमी होऊ शकतात.

मी शारीरिक व्यंग, त्रास असूनही नियमित रक्तदान करीत असतो, रक्तदानाची शंभरी कधीच पार केलेली आहे. यामुळे मला कुठलाच त्रास नाही तर नेहमी स्फूर्तीमय, प्रसन्न वाटतं. साधारण वर्षातून चार वेळा आपण सहज रक्तदान करू शकतो.

मुकुंद गोसावी

(रक्तदान सेवा कार्यकर्ता)

अध्यक्ष मुक्ती फाउंडेशन,जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.