एकाकी ज्येष्ठ नागरीकांनी पोलिसांच्या संपर्कात राहिल्यास संकटकाळी मदत शक्य – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक संघाशी व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून ज्येष्ठ नागरीकांशी सुसंवाद घडवून आणला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, ज्यांची मुले दूर आहेत किंवा ज्यांना मुले नसल्यामुळे असहाय्यपणे पती-पत्नीना एकटे रहावे लागते, काही ठिकाणी एकच ज्येष्ठ व्यक्तीला घरी राहण्याची वेळ येते अशा ठिकाणी अडचणीच्या वेळी पोलिसांशी संपर्क साधल्यास साध्या वेशातील कर्मचारी निश्‍चित मदत करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दवाखान्यात नेण्यासाठी अथवा संरक्षणासाठी गरज भासल्यास पोलीस दल मदतीसाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे होते. यावेळी सुनंदा औंधकर, जी.आर.ठाकूर मामा, विलास चौधरी यांनी मनोगत मांडले. उपअधीक्षक वाघचौरे यांचा अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ आणि जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले की, हल्ली ऑनलाईन गुन्ह्याच्या फसवणुकीत वाढ झाल्याने ज्येष्ठांनी व्यवहार सावधपणे करावेत. मोबाईलवर कुणालाही आपल्या बँकेचा वा एटीएम कार्डाचा तपशील देऊ नये शिवाय कुठल्याही लॉटरी व बक्षिसाच्या रकमेच्या फोन कॉलला बळी पडू नये,ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता गरजेची आहे असेही आवाहन त्यांनी केले. चुकून फसवणुकीचा प्रकार घडल्यास पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.

संघाचे मार्गदर्शक जी.आर.ठाकूर यांना ‘रोटरी साइटेशन फॉर मेंबरशिप डेव्हलपमेंट’ हा जागतिक पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार बापू मांडळकर, आर.एल.पाटील, गोपाल तिवारी यांनी केला. तसेच राजीव शर्मा यांचा सत्कार डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व नाना पाटील यांनी वृक्ष भेट देऊन केला. रीदम मेडीकलचे संचालक गौतमजी चोरडीया यांचा सत्कार अनिल बर्‍हाटे आणि डी.डी.जावळे यांनी केला. वाघचौरे यांचा सत्कार श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रघुनाथआप्पा सोनवणे व जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विलास चौधरी यांनी केला. विश्वप्रार्थना आणि प.पू.गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन अलका अहिरराव यांनी केले. सूत्रसंचालन रागिणी पुराणिक तर आभार प्रकाश विसपुते यांनी मानले. सुरेंद्रसिंग पाटील, निलेश वाणी, पोपटराव पाटील, जे.एन.पुराणिक व असंख्य ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.