एकनाथराव खडसेंचाही फोन टॅप झाला होता

0

इंग्रजी वर्तमानपत्राच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, फोन टॅप हे विरोधी पक्षांचे नेतेच नव्हे तर भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा देखील करण्यात आला होता असा दावा फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्राने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना राज्य सरकारमधील एक आयपीएस अधिकारी हा इस्त्राएलच्या दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यात फोन टॅपिंगसाठी व व्हॉट्सअॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून ‘पेगॅसस’ ही प्रणाली विकत घेण्यात आली होती. याच सॉफ्टवेअरच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांच्या फोनवर नजर ठेवण्यात आली होती. यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप करण्यात आला होता असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीला सहा आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.