वय वर्ष फक्त १०३ पण कार्य ‘तरुणाईला ‘ प्रेरणा देणारे !

0

साकळी पिक संरक्षक संस्थेचे  चेअरमन देवमन चौधरी; काळजीने सांभाळतात पदाची जबाबदारी

साकळी ता.यावल- माणूस तरुण वयात असतांना कोणतीही जबाबदारी अगदी सहज पेलू शकतो कारण त्याला त्याच्या शरीराचे सर्व अवयव साथ देत असतात व तरुणाईचाही एक वेगळाच ‘ जोश ‘ त्यांच्याकडे असतो. परंतु  एखाद्या वयोवृद्ध व्यक्ती आपल्या वयाची तब्बल शंभरी ओलांडून सुध्दा तरुणाईला  लाजवेल असेच अगदी शिस्तीने व जबाबदारीने आणि आपल्या पदाची जाणीव ठेवत सामाजिक कार्य करत आहे. ही बाब आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी व दीपस्तंभासारखी आहे. तथापि वयाने म्हातारे परंतु कर्तुत्वाने  ‘ तरुण ‘ अशी ही कोण व्यक्ती असेल ? असे वाटणे सहाजिकच आहे. तर ही व्यक्ती आहे साकळी ता.यावल येथील पीक संरक्षण सोसायटीचे विद्यमान चेअरमन देवमन सिताराम चौधरी हे होय.

देवमन चौधरी त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात सन १९१८ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला आहे. त्या काळातील त्यांच्या प्रतिकूल परिस्थिती नुसार व शिक्षणाची सोयी नसल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही मात्र व्यवहारासाठी वाचता- लिहिता यावे म्हणून त्यांनी दोन महिने प्रौढ शिक्षण वर्गात शिक्षण घेतले व त्यांनी वाचायला -लिहियला शिकून स्वतःची सही करायला लागले. पत्नी,चार मुले,दोन मुली अशी सदस्यसंख्या असलेल्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी सुरूवातीला गावातील पिक संरक्षण संस्थेत ‘ रखवालदार ‘ म्हणून अगदी अल्प मानधनावर काम केले होते. नंतरच्या काळात मुलांचे शिक्षण व इतर प्रपंचाने त्यांच्या  कुटुंबाचा आर्थिक भार वाढल्याने त्यांनी शेती करणे सुरु केले. गावात त्यांना सर्वत्र  ‘ बाबा ‘ म्हणून ओळखतात. त्यांचे आजचे वय  जवळपास १०३ वर्ष असून गावातील माळी समाजातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे सांगितले जाते. साकळी पीक संरक्षण सोसायटीच्या सन २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देवमन चौधरी हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेले होते.तसेच सध्या त्यांच्याकडे दि.५ जुलै २०१९ पासून चेअरमनपदाची जबाबदारी आहे.

वयाची शंभरी पार केलेली असतांनासुद्धा श्री. चौधरी हे आपल्या चेअरमनपदाची जबाबदारी धडाडीने व संस्थेच्या हिताशी बांधीलकी ठेवत पार पाडीत आहे. शेतकऱ्यांची तक्रार निवारण करण्यासाठी शेती बांधावर जाऊन भेट देऊन निराकरण करणे, संस्थेच्या कारभारावर तसेच शेतात  रखवाली करणाऱ्या रखवालदारांवर लक्ष ठेवणे. शेतकऱ्यांच्या भेटी घेणे व त्यांच्याशी विचारपूस करून समस्या- अडचणी समजून घेणे व  संस्थेच्या नियमानुसार सोडवण्याचा प्रयत्न करणे. शेती पिकांच्या चोरीबाबत पोलीस प्रशासनाला संस्थेच्या वतीने तक्रार करणे या सह संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष देणे एवढ्या जबाबदऱ्या श्री.चौधरी हे  आपल्या वयाचा विचार न करता व्यवस्थितपणे पार पाडीत असतात. श्री चौधरी हे  नातू पणतू चे धनी असून त्यांचा एक मुलगा दिनकर चौधरी हे  ग्रामपंचायत सदस्य असून इतरही मुले सामाजिक कार्यात सक्रिय असून आपल्या व्यवसायात व्यस्त आहे.  त्यांचे सध्याचे शंभरीपार वय असून सुद्धा संस्थेशी असलेली बांधिलकी व संस्थेच्या हितासाठी जे अहोरात्र झटत आहे ही बाब  खरोखर आजच्या तरुण  पिढीसाठी स्फूर्तिदायी आहेच तसेच जगण्यासाठी नवउमेद देणारे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.