‘उज्ज्वला’ योजनेंतर्गत ९० टक्के घरांत पोहोचले गॅस सिलिंडर

0

नवी दिल्ली –

प्रदूषण घटविणारे इंधन लोकप्रिय करण्याच्या आणि निर्धन कुटुंबांना किमान किंमतीत इंधन उपलब्ध करून देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील १० पैकी नऊ घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी हे प्रमाण १० घरांमध्ये पाच इतके होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेमुळे स्वयंपाक करण्यासाठीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन स्वच्छ इंधन असलेला गॅस सिलिंडर आज गावागावांत पोहोचला आहे. उज्ज्वला योजनेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे एप्रिल २०१५पासून सार्वजनिक तेल वितरण कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये १० कोटी ग्राहकांची भर पडून सक्रिय ग्राहकसंख्येत दोन तृतीयांश वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे ऑक्टोबरअखेरीस स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या घरांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. एक एप्रिल २०१५मध्ये गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या घरांचे देशभरातील प्रमाण ५६.२ टक्के होते.

अधिकाधिक घरांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरसारख्या स्वच्छ माध्यमाचा वापर वाढीस लागावा यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेची घोषणा केली होती. त्यासाठी गॅसवर अनुदान घेणाऱ्यांना तिचा त्याग करण्याविषयीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जवळपास एक कोटी ग्राहकांनी अनुदान नाकारले होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेलवितरण कंपन्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना निशुल्क गॅस सिलिंडरच्या जोडण्या दिल्या. स्वयंपाकासाठी कमी वेळ लागत असल्याने तसेच महिलेचे श्रम वाचत असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ही योजना उचलून धरण्यात आली. आर्थिकदृष्ट्या निर्धन असलेल्या कुटुंबांसाठी देण्यात येणाऱ्या नव्या गॅसजोडणीवरही अनुदान देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

ग्रामीण भागामध्ये घरगुती गॅससाठीची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशातील एकूण गॅस ग्राहकांपैकी निम्म्याच्या वर ग्राहक म्हणजेच १३.६ कोटी ग्राहक शहरांमध्ये आहेत. सध्या देशातील एकूण सक्रिय गॅसग्राहकांची संख्या २४.९ कोटी असून, २२.९ कोटी ग्राहकांना अनुदानाचा लाभ देण्यात येतो. एकूण ग्राहकांमध्ये दोन सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास निम्मी आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांना नियमित गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याचे आव्हान आता कंपन्यांसमोर ठाकले आहे. नव्या ग्राहकांपैकी अद्याप बरेच जण प्रदूषणात भर घालणाऱ्या पारंपरिक इंधनाचाच वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. गॅस सिलिंडर संपल्यानंतर नवीन मिळेपर्यंत काहीच पर्याय उपलब्ध होत नसल्याचेही दिसून आले आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढत असतानाच वितरण व्यवस्था जुनीच असल्याने नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर मर्यादा येत असल्याचेही दिसून आले आहे.

उत्तरेमध्ये वाढते प्रमाण 

उत्तरेकडील राज्यांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर वापराचे प्रमाण उर्वरित देशापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. उत्तरेकडे सध्या गॅस वापराचे प्रमाण ९९.९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक गॅसवापर असलेल्या राज्यांमध्ये पंजाब (१३६ टक्के) आघाडीवर असून, त्यापाठोपाठ दिल्लीचा (१२६ टक्के) क्रमांक लागतो. चंडीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये हेच प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ८९.७ टक्के आणि ९५.४ टक्के असल्याचे आढळून आले आहे. गॅस सिलिंडर ग्राहकांची एकूण संख्या आणि राज्याची एकूण लोकसंख्या या आधारावर गॅस वापराचे प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.