आमदार गिरीश महाजनांना दाखवा आणि दहा लाख मिळवा

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात करोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. जामनेरात आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाली असून आरोग्य सुविधा कमी पडत आहे. असे असताना संकटमोचक व आरोग्यदूत म्हणवून घेणारे जामनेरचे अमादार गिरीश महाजन जामनेरवासियांना वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ‘आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये मिळवा’ असे फलक हातात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जामनेर शहरात लक्षवेधी आंदोलनही केले.

संपूर्ण राज्यात करोना संसर्ग वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील दररोज हजार ते बाराशे नवीन रुग्ण आढळत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. एकीकडे जामनेरात करोना संसर्ग वेगात असताना जामनेरचे आमदार मात्र पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरात आज अनोखे आंदोलन केले. ‘तालुक्याचे आमदार माजीमंत्री व संकटमोचक म्हणून ख्याती असलेले आरोग्यदूत आमदार गिरीश महाजन साहेब आहेत तरी कुठे? आपणास संपू्र्ण तालुका व जामनेर शहरातील रहिवासी शोधताहेत…! आता तरी करोनाच्या महामारीत मदतीला धावून या..’ असं लिहिलेले फलक दाखवत राष्ट्रवादीने महाजन यांना लक्ष्य केले. ‘गिरीश महाजन यांना दाखवा व दहा लाख रुपये मिळवा ’अशा घोषणाही राष्ट्रवादीचे पदाधिकारी देत होते. करोना सारख्या गंभीर संकटाच्या काळात सर्व आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात झटून काम करीत आहेत. अशावेळी गिरीश महाजन यांची तालुक्याला गरज असताना ते येथे दिसत नसल्याबद्दल देखील आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.