आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली : मा.आ. दिलीप वाघ

0

पाचोरा (प्रतिनिधी)

“७० वर्षात १४ आमदारांनी काहीच केले नाही – मला सर्व निस्तराव लागत आहे. मी साडे आठशे कोटीची कामे आणली” अशा वल्गना आ.किशोर पाटील यांनी केल्या. आपण जे बोलतो आहोत ते तालुक्यातील माजी मंत्री, आमदारांना कर्तुत्व शून्य म्हणून संबोधणारी विधाने आहेत. याची उपरती त्यांना उशिरा झाली. कदाचित जाणकार शिवसैनिकांनी आमदारांच्या लक्षात हे आणून दिले असावे. म्हणून केवळ बहुजन समाजाला खूष करण्यासाठी कै. के. एम. बापू पाटील यांना गौरवणारा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. पण एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही याचे भान आमदारांना राहिलेले नाही.

भावनिक मुद्दे पुढे केले म्हणजे वस्तुनिष्ठ, खरा इतिहास लपवता येत नाही. आ. किशोर पाटील यांनी कै. के. एम. बापूंचा गौरव केला तर त्याला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो पण त्यामुळे मतदारसंघाचा विकास घडविणाऱ्या इतर नेत्यांना जाणून बुजून दूर ठेवण्याचा, त्यांचा नामोल्लेख सुद्धा टाळण्याचा दळभद्री आणि हलकटपणा कृतीतून आणि वाणीतून सिद्ध केला म्हणजे काही विकास कामांचा इतिहास बदलत नाही. आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली.

कै.के. एम. बापूंचे कार्यकर्तृत्व निर्विवाद आहे. काँग्रेस विरोधात विरोधी पक्ष मजबूत करण्याचे काम कै.आप्पासाहेब ओंकार वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले हा इतिहास सर्वश्रुत आहे. कै.बापूसाहेब, कै.थेपडे साहेब, कै.आप्पासाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  दरवर्षी पी.टी.सी शिक्षण संस्थेत आम्ही व्याख्यानमाला चालवतो. त्यांना आदरांजली अर्पण करतो. गलिच्छ राजकारण करत नाही. बहुळा धरणाच्या उभारणीचा इतिहास आम्ही पत्रकार परिषदेतून मांडलाच आहे. तो खोटा ठरवता येत नाही. बहुळा धरणाची पायाभरणी करण्याची भूमिका बापूसाहेबांनी आणि वीस वर्षानंतर ते पूर्ण करण्याची भूमिका आप्पासाहेबांनी पार पाडली हे सत्य आहे. ते जरा पाटबंधारे खात्याचे रेकॉर्ड तपासून आमदारांनी मते मांडावीत, विषयाला फाटे फोडू नयेत. कै. आप्पासाहेबांची भूमिका नाकारू नये.

कै.बापूसाहेबांचे धरणस्थळावर स्मारक उभारण्याची कल्पना आणि धरणाचे नामकरण करण्याचा मनोदय हा काही बापूसाहेबांवर प्रेम असल्याने आमदारांनी व्यक्त केला असे नाही. तर, हे केवळ कै. ओंकारअप्पा आणि त्यांच्या वारसदार कार्यकर्त्यांवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली कुरघोडी आहे. हे सिद्ध करायला न्यायाधीशांची अथवा विचारवंतांची गरज नाही. देशभरात धरणांची ओळख व्यक्तीची नावे देऊन होत नाही. धरणे नद्यांच्या नावाने ओळखले जातात. नद्यांना पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. धरणे अथवा मोठे प्रकल्प उभारणाऱ्याची नावे कोनशिलेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला कळतात.

केवळ निवडणूक स्टंट म्हणून असे भावनिक मुद्दे आमदार उपस्थित करीत आहेत. कै.आर ओ. तात्यांनी दहा वर्ष आमदार या नात्याने नेतृत्व केले. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसीच होते. स्वतः किशोर पाटील गेल्या पाच वर्षापासून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या काळात कधीच त्यांच्यासमोर कै.बापूसाहेबांच्या स्मारकाचा विषय आला नाही. महिना-दिडमहिन्यात होणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. किशोर पाटील जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेवटी ही जाणीव करून द्यावीशी वाटते की पाचोरा मतदार संघाचा सार्वत्रिक विकास साधण्यासाठी झटणाऱ्या कोणत्याच नेत्याच्या कर्तुत्वाला झाकण्याचा उद्योग आम्ही कधीच करणार नाहीत. यापूर्वीही कधी केला नाही. कॉंग्रेस विरोधात संघर्ष करण्यात आमच्या घराण्याचा बहुतांश काळ खर्ची पडला. तरीही तत्कालीन काँग्रेस नेत्यांचे आम्ही स्मरण करतो. दिवंगत नेत्या विषयी संभ्रम निर्माण होईल अशी भूमिका आम्ही कधी मांडली नाही. पुढेही कधी ते पाप करणार नाही.

कर्तुत्ववान विभूतींना मरणोत्तर डावलण्याचा आणि त्यांचा नामोल्लेख टाळण्याचा हलकटपणाचा विचार परमेश्वराने आमच्या डोक्यात कधीच टाकू नये अशी प्रार्थना करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.