आणखी किती फेरीवाल्यांच्या आत्महत्या शासनाला पाहायच्या आहेत ?

0

जळगाव 

येथील फुले मार्केटमधील हॉकर्स संजय मुधळदास चिमरानी यांनी लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने आत्महत्या केली. यामुळे हॉकर्सचे मनोबल खचत असून आणखी किती आत्महत्या महानगरपालिका प्रशासनाला पाहायच्या आहेत असा भावनिक सवाल महात्मा फुले मार्केट हॉकर्स असोसिएशनने विचारला आहे. याबाबत प्रसारमाध्यमात हॉकर्स बांधवांनी व्यथा मांडली.

लॉकडाऊन काळात महापालिका प्रशासनाने हॉकर्स बांधवांचा ८ ते १० लाख रुपयांचा माल जप्त करून ठेवला आहे. तसेच मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास देखील परवानगी दिलेली नाही. व्यवसाय करण्यास बसले तर पुन्हा बंद पाडतात. कायमस्वरुपी मनपाचे पथक महात्मा फुले मार्केटमध्ये बसून असते. ही एकप्रकारे हिटरलशाही व दडपशाही आहे. संजय चिमरानी यांची आत्महत्या म्हणजे महापालिका प्रशासनाने केलेल्या मनमानी कारभाराचा व दडपशाहीचा बळी आहे. महापालिका प्रशासनाच्या भेटीला गेल्यावर ते असहकार्याची भूमिका घेतात. तसेच जप्त केलेला माल कुठल्याही परिस्थितीत देणार नाही. अशी आडमुठी भूमिका महापालिकेच्या अधिका-यांनी घेतली आहे. ही भूमिका लवचिक होण्याची अपेक्षा हॉकर्स बांधवांची आहे. हॉकर्स बांधवांना पर्यायी जागा देण्याविषयी महापालिका अनुकूल आहे. मात्र आहे त्याच महात्मा फुले मार्केटच्या जागेवर व्यवसाय मंदी चालू आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी पर्यायी जागा देऊन उपयोग नाही असेही हॉकर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सर्व बाजार व मार्कैट दुपारी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अशावेळी महात्मा फुले मार्केटमध्ये हॉकर्स बांधवांनी देखील पूर्वीप्रमाणे व्यवसाय करु देण्यास परवानगी देण्यात आली पाहिजे. काही व्यापारी हॉकर्स संघटनेच्या कामकाजाला विरोध करतात. त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे यासह जप्त १० लाख रुपयांपर्यंतचा माल तात्काळ मनपा प्रशासनाने परत केला पाहिजे. अशा प्रमुख मागण्या असल्याची माहिती महात्मा फुले मार्कैट हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदू पाटील व सचिव सचिन जोशी यांनी केली आहे.

यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेवून दाद मागितली जाणार आहे. तरी न्याय मिळावा असे हॉकर्स सादिक मनियार, बापू चौधरी, गोविंदा कुंभार, शोएब शेख, भैय्या चौधरी, गुड्डू मिश्रा, राहुल शेवाळे, ज्ञानेश्वर गुजर, प्रविण जोशी, राजू कटारिया, मनोज राणा, प्रेम कटारिया, मनोज चौधरी, राजू नन्नवरे, इरफान शेख, रवी चौधरी, रईस मणियार,शेखर वाणी,  भरत पवार, गोलू गवळी, संजय जोशी, जांगिर शेख, ऋषी पवार आदींची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.