आज दुपारी राज्यात वादळी पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

0

मुंबई :– मान्सूनचे १५ जून रोजी कोकणात आगमन झाले असले तरी अद्यापि मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. दरम्यान  आज, शनिवारी २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता कमी आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.

२६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल. तो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.