अवैधरित्या स्टॅम्प विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश

0

जळगाव :- मुळ किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारुन नागरीकांची अडवणूक करणार्‍या अवैध स्टॅम्प विक्रेत्यांवर संबंधित विभागांने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज दिले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वैधमापन विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.भ. बांगर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी,  सहायक आयुक्त् कार्यालयाचे श्री. व्ही. टी. जाधव, सहायक पोलीस निरिक्षक जानकर, दुरसंचार विभागाचे अरुण पाटील, अशासकीय सदस्य ड.मंजुळा मुंदडा, पल्लवी चौधरी, रविंद्र महाजन, अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतीष गडे, विजय मोहरीर, विकास महाजन, सुरेश रोकडे यांच्यासह  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर म्हणाले की, मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमत घेणे हा गुन्हा आहे. त्याचबरोबर अशारितीने  कोणी नागरीकांची अडवणूक करीत असेल तर त्याला शासन झालेच पाहिजे. तहसील कार्यालय व कोर्ट परिसरात जर कोणी व्यक्ती अवैधरित्या मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमतीला स्टॅम्प ची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याचेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील काही तहसील कार्यालयाच्या आवारात काही व्यक्ती स्टॅम्प वेंडर नसूनही अवैधरित्या अधिक किंमतीला स्टॅम्प विक्री करीत असल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी केली होती.

त्याचबरोबर बँक खात्यावरुन पैसे काढण्यासाठी नागरीक एटीएम चा वापर करतात. अशावेळी स्वत:चे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा तर इतर बँकेच्या एटीएम मधून तीन वेळा विनामुल्य पैसे काढता येतात. यापेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास व्यवहार शुल्क आकारले जाते. परंतु अनेकवेळा नागरीक पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेल्यास एटीएममध्ये पैसेच नसतात. परंतु एटीएमवर पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पैसे न मिळताही व्यवहार शुल्क आकारले जात असल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी आजच्या बैठकीत केली असता याबाबत संबंधित विभागाला विचारणा करण्याची सुचनाही अपर जिल्हाधिकारी गाडीलकर यांनी दिली.

अशासकीय सदस्यांकडून उपस्थित शहरातील हॉटेलमधील स्वच्छतागृहे महिला व लहान मुलांना विनामुल्य वापरु देणे, शहरातील महत्वाचे रस्त्यांवरील पार्कीग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रवासी वाहतुक करणार्‍या खाजगी लक्झरी बसेसकडून होणारी अवाजवी भाडे आकारणी, एरंडोल नगरपालिकेचा भोंग्या वाजविणे आदि विषयांवर आलेल्या तक्रारी  तसेच सुचना स्वीकारल्या. तसेच आजच्या बैठकीत उपस्थित तक्रारींचे निराकरण पुढील बैठकीपूर्वी करून ग्राहकांचे हित जोपासण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलवार यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या. प्रारंभी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मागील सभेतील परिवहन विभाग, अन्न व औषध  प्रशासन विभाग, नगरपालिका, वजनमापे आदि विभागासंदर्भातील तक्रारींचा आढावा घेतला. तसेच यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती सदस्यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.