अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल

0

मलकापुर, प्रतिनिधी 

चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यान दोन जणांचा मृत्यु झाल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले होते. दि 4 जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील  वृषाली समाधान तायडे (वय 30) अनुभव समाधान तायडे (वय 6) यांचा विष प्राषन  केल्याने मृत्यु झाला होता. तर वैभव समाधान तायडे (वय 11) आणि एक 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकर मुलगा याच्यावर उपचार सुरू होते. या घटनेने संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती. विविध प्रश्न उपस्थित केले  जात होते. पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला असुन अल्पवयीन प्रियकर मुलानेच तिघा मायलेकांना विष पाजल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतक वृषाली हिचे गावातीलच एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत गेल्या 6 महिन्यापासून प्रेमसंबध होते. याबद्दल वृषालीच्या सासु आणि दिराने वृषालीला 8 दिवसांपूर्वी विचारणा केली असता तिचे सासू आणि लहान  दिरासोबत भांडणही झाले होते. माझे कुठेही संबंध नाहीत असे ती घरच्यांना ठणकावून सांगत होती. यातच वृषाली हिच्या पतीचाही वृषालीवर  विश्वास असल्याने तोही आईसोबत माझी पत्नी “तशी” नाही म्हणुन वाद झाले होते. अल्पवयीन मुलगा गावातच शेती आणि क्रेन मशीनचे काम पाहतो. वहिनी वहिनी म्हणता म्हणता त्याचे वृषालीसोबत प्रेमसबंध तयार झाले. दि 4 जुलै च्या रात्री वृषालीचा पती समाधान आणि वृषालेचे सासरे हे शेतात हरणापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी गेले होते. घरासमोर अंगणात खाट टाकुन सासु झोपली होती.

याच संधीचा फायदा घेत वृषालीचा 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकर त्यांच्या घरात घुसला. ही  बाब अंगणात झोपलेल्या सासूच्या लक्षात आल्याने सासूने शेजारीच राहणारा पुतण्या युवराज तायडे याला बोलावुन घेतले. व  वरिष्ठांच्या कानावर घालावी म्हणुन युवराजने गावचे सरपंच आणि पोलीस पाटलांना बोलावुन घेतले. सरपंच आणि पोलीस पाटील यांनी सांगितल्यानुसार ते आले तेव्हा घरातील लाईट बंद होता. घराला आतुन कडी लावलेली होती. खिडकीतून आवाज देऊनही आतुन उत्तर येत नव्हते.  मात्र विषारी औषधाचा वास येत असल्याने  पोलीस पाटील यांनी ही बाब धामणगाव बढेचे ठाणेदारांच्या कानावर घातली.

ठाणेदारांनी दरवाजा तोडण्याचा आदेश दिला. दरवाजा तोडला तेव्हा घरातील तिघे मायलेक व 17 वर्षीय  अल्पवयीन प्रियकर गंभीर अवस्थेत होते. त्यांना लगेच मलकापुर येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच वृषाली आणि तिचा 6 वर्षीय चिमुरडा अनुभव याचा मृत्यु झाला होता. या घटनेतील 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकर आणि वृषाली हिचा मोठा मुलगा वैभव  उपचार घेत होते. तपासादरम्यान अल्पवयीन प्रियकर मुलानेच तिघांना विष पाजल्याचे समोर आल्याने त्याच्यावर खून आणि  खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास धा.बढे पो.स्टे चे स.पो.नि ममताबादे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.