शेंदुर्णीत संत कडोजी महाराजांच्या नामघोषात रथोत्सव उत्साहात साजरा

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णीच्या भगवान श्री. त्रिविक्रम महाराज व संतश्रेष्ठ कडोजी  महाराज यांची पालखी व रथोत्सव सोहळा आज बुधवार दि.१७ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याने संतश्रेष्ठ कडोजी महाराज, भगवान श्री. त्रिविक्रमाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे उत्सवाचे हे २७७ वे वर्ष आहे.

 सकाळी १० वाजता रथाची पुजा

रथाची पुजा सकाळी १० वाजता करण्यात आली. शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे, अमृत बापु खलसे, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे सचिव सतिषचंद्र काशिद, संचालिका उज्वलाताई काशिद, संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, शारदाताई भगत, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या हस्ते रथाची पुजा करण्यात आली.

विजय गुरुजी पाठक, भुषण देवकर, अँड. देवेंद्र पारळकर यांनी  ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात रथाची पुजा व आरती करण्यात आली. यावेळी माजी सरपंच सागरमल जैन, माजी पं. स. सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, राजेंद्र पवार, ह.भ.प. शिवाजी महाराज भगत, ईश्वर महाराज भगत, प्रल्हाद भगत, तुषार भगत, शिवराम महाले, यात्रा कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक शरद बारी आदी उपस्थित होते.

 शांततेत व नियमांचे पालन करत रथोत्सव   

यंदाच्या वर्षी रथोत्सव होत आहे, याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.  करोनामुळे मात्र यावर नियमावली देऊन परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. यामुळे रथ मार्गावर बँरिकेटींग करण्यात आलेले होते. भाविकांनी मास्कचा वापर करुन गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले होते. याची सर्वांनी अंमलबजावणी करत हा रथोत्सव शांततेत सुरळीतपणे साजरा केला. दुपारी दिलेल्या वेळेस शहरातील मुख्य मार्गावरुन रथ जात असतांना भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. रथावर केळी वाहुन आपला नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होती. यंदा एस.टी.चा संप, पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे भाविकांच्या संख्येत कमी जाणवत होती. आज शेंदुर्णीचा आठवडे बाजार असल्याने यात्रा जरी यंदा नसली तरी बाजारात गर्दी होती.

चोख पोलीस बंदोबस्त             

हा रथोत्सव शांततेत व सुरळीतपणे व्हावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चाळीसगाव विभागाचे अति. जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुरचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोउनि. बनसोड, मोहिते तसेच जळगाव, पाचोरा, जामनेर येथील पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, एस.आरपीएफची तुकडी  मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवुन होते. यावेळी रथोत्सवास सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, नायब तहसिलदार निंभोळकर, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पोलीस पाटील ममता सुर्यवंशी तसेच भाविक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खास आकर्षण 

रथाच्या अग्रभागी अश्वारुढ भगवा पताका हाती घेऊन बालक होता, एकाच रंगाच्या नऊवारी वेश परिधान केलेल्या महिला भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी विविध संतांच्या अभंगात तल्लीन झाले होते, नुरानी मस्जीद जवळ रथाची मुस्लिम बांधवांच्या कडुन माजी उपसरपंच खलील डेप्युटी यांनी पुजा केली, संस्थानच्या वतीने त्यांचा पुष्पहार ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, शहरातील विविध धार्मिक ,सामाजिक संस्था यांच्या वतीने भाविकांना चहा,फराळ, केळी वाटप करण्यात आले, रथाच्या आदल्या रात्री तसेच रथोत्सव संपन्न झाल्यावर लगेचच नगरपंचायतीचे वतीने रथ मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले, शहरातील मुख्य मार्गावर जागोजागी बँरिकेटींग करण्यात आलेले होते त्यामुळे सर्वांना सुलभतेने रथाचे दर्शन झाले, यंदा मात्र यात्रोत्सवास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिक तसेच चिमुकल्यांमध्ये जरा नाराजी जाणवत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.