राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मका, ज्वारी, बाजरीची शासकीय खरेदी थांबली – आ चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव मतदारसंघातील खरीप हंगाम २०२०-२१ साठी ५६० शेतकऱ्यांनी मका,  १२३ शेतकऱ्यांनी बाजरी व ११२ शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ मका ८० शेतकरी, बाजरी ३९ शेतकरी व ज्वारी ६२ शेतकरी इतकीच खरेदी शासनातर्फे दि.१६/१२/२०२० पर्यंत करण्यात येऊन उर्वरित शेतकऱ्यांना शासनाचे खरेदी उद्धिष्ट संपल्याचे कारण सांगून खरेदी नाकारण्यात आली. एकूण नोंदणीच्या २० टक्के देखील मका, ज्वारी, बाजरी खरेदी न झाल्याने याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह पणनमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, मार्केटिंग फेडरेशन यांना तात्काळ पत्र देऊन उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली होती.

मात्र केंद्र सरकारने मका आणि ज्वारी खरेदीची तयारी वारंवार दर्शवली असूनही राज्य सरकार योग्य ती माहिती देत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेती क्षेत्राची कुठलीही जाण नसलेले मुख्यमंत्री, केवळ मलिदा असलेल्या खात्यांमध्ये व प्रकरणात रस असणारे काँग्रेस – राष्ट्रवादी चे मंत्री यांच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

एकीकडे कृषी कायद्यांना विरोध करायचा मात्र दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी हलगर्जीपणा करायचा त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे शेतकरी प्रेम नाटकी असल्याचे उघड झाले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाने ५ वेळा स्मरणपत्र पाठवून देखील राज्य शासनाने खरेदी केलेल्या मालाची वितरण व्यवस्था कशी असेल याची माहिती न दिल्याने केंद्र सरकारला मका, ज्वारी, बाजरीचे वाढीव उद्धिष्ट देता येत नाही आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका आमदार चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.