ऐतिहासिक.. देशाला मिळणार पहिले समलैंगिक न्यायाधीश

0

नवी  दिल्ली, लोकशाही न्यूज  नेटवर्क 

देशाच्या न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक घटना घडणार आहे.  देशात प्रथमच समलैंगिक व्यक्ती आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सौरभ कृपाल  यासाठी लढत होते.

ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय २०१८ पासून अनेकदा पुढे ढकलला गेला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अखेर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कॉलेजियमने एका निवेदनात म्हटले आहे. कृपाल समलैंगिक आहे आणि त्यांची निवड झाल्यास समलिंगी हक्कांसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. कृपाल हे समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या महत्वपूर्ण खटल्यातील दोन याचिकाकर्त्यांचे वकील होते.

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने सरकारने वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही कृपाल यांच्या नावावर भूमिका घेतली होती. सौरभ कृपाल यांचा जोडीदार युरोपियन असून स्विस दूतावासात काम करतो. त्यामुळे हितसंबंधांचे कारण सांगत केंद्राने त्यांच्या पदोन्नतीवर आक्षेप घेतला होता.

सरन्यायाधीश रमणा यांच्याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शिफारस करणाऱ्या कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती यू यू ललित आणि एएम खानविलकर सदस्य आहेत. २०१८ मध्ये कृपाल यांच्या उमेदवारीचा विचार करण्यात आल्याच्या जवळपास तीन वर्षांनी एससी कॉलेजियमची शिफारस आली आहे. त्यानंतर कॉलेजियमने कृपाल यांच्या शिफारशीवरील निर्णय तीन वेळा पुढे ढकलला.

सौरभ यांना समलैंगिकतेमुळे न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली, असे म्हटले जात आहे. खुद्द सौरभ कृपाल यांनीही एका मुलाखतीत असेच काहीसे सांगितले होते. फेब्रुवारीमध्ये, कृपाल यांची नियुक्ती त्यांच्या लैंगिकतेमुळे रखडली होती अशा अटकळींदरम्यान, माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना गुप्तचर माहितीबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. कृपालच्या जोडीदाराच्या राष्ट्रीयत्वावर आक्षेप नोंदवत सरकारने त्यांना परत पत्र पाठवले होते.

सौरभ कृपाल हे न्यायमूर्ती बीएन कृपाल यांचे पुत्र आहेत. ते मे २००२ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत भारताचे ३१ वे सरन्यायाधीश होते. सौरभ कृपाल यांनी सेंट स्टीफन्स, दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्डला गेले. सौरभ कृपाल यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

तसेच भारतात परतण्यापूर्वी सौरभ कृपाल यांनी जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये काही काळ काम केले. दोन दशकांहून अधिक काळ ते भारतात वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात नागरी, व्यावसायिक आणि घटनात्मक कायदा यांचा समावेश होतो. सौरभ कृपाल समलिंगी आहेत आणि ते LGBTQ हक्कांसाठी आवाज उठवत आहे. त्यांनी ‘सेक्स अँड द सुप्रीम कोर्ट’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. त्यांचा जोडीदार निकोलस जर्मेन हा परदेशी नागरिक असून तो स्विस मानवाधिकार कार्यकर्ता आहे. मार्च २०२१ मध्ये, सौरभ कृपाल यांना वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या सर्व ३१ न्यायमूर्तींनी त्यांच्या बाजूने एकमताने मतदान केले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.