कार्यसंस्कृती

0

लोकशाही विशेष लेख

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने घडवून आणलेले बदल आता प्रत्यक्षात रुळू लागलेले आहेत. ज्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्राचा चेहरा बदलायला सुरुवात झाली आहे. छोट्या, मध्यम, लघु उद्योगांपासून ते कोर्पोरेट सेक्टर व बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वानाच आता कार्यसंस्कृती हा शब्द परवलीचा झालेला आहे. व्यावसायिक स्पर्धेच्या रेट्यात आपली जागा मिळवणे व मिळविल्यावर ती टिकवणे त्यासोबतच प्रगती साधणे असे दुहेरी आव्हान आता सर्वांच्या समोर आहे.

प्रशक्षित व कौशल्याधारी मनुष्यबळ हा उद्योगाचा कणा आहे, याची प्रचिती यायला लागली असून प्रत्येक आस्थापनेला आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या मनुष्यबळाची क्षमता वाढवण्यासोबतच कार्य अधिक प्रभावीपणे कसे होईल या दिशेने प्रयत्नशील असणे हे मानव संसाधन विभागाचे महत्वाचे कार्य आहे. एखादी आस्थापना अथवा उद्योग किंवा संस्था केवळ इमारती किंवा इतर तत्सम मालमत्तानेच घडते असे नाही, तर त्या संस्थेतील मानव संसाधनांची संस्थेच्या जडणघडणीमध्ये फार म्हणत्वाची भूमिका असते.

यासाठी मानव संसाधन संभाळणे त्याच्या गुणवत्तेत वाढ करणे त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेणे आणि या सर्वाना एक मानवी चेहरा प्रदान करणे हेच महत्वाचे कार्य आहे. यासाठी कार्यसंस्कृती ही महत्वाची ठरते. कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी असणारे हितसंबंध, त्याच्यामधील प्रेम व आदराची भावना, त्यांच्या परस्परांविषयीचे मतमतांतरे व ते व्यक्त करण्याच्या पद्धती या सोबतच संस्थेच्या ध्येयाधोरणाप्रती असणारी बांधिलकी त्यासाठी निष्ठेने, तळमळीने कार्य करण्याची तयारी व पद्धती या काही महत्वाच्या बाबींवरच लक्ष केंद्रित करणे, प्रोत्साहन मिळेल असेच वातावरण निर्माण करणे म्हणजे उत्कृष्ठ कार्यपद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे. या घटकाने जर काम करायचे असेल तर त्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे म्हणजे कार्यसंस्कृती ही उच्च पातळीवर नेणे. जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याचे मनोबल हे आस्थापनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम करण्यासाठी तयार होईल व त्याचप्रमाणे ते कार्यरत असतील.

आपली देशातील काही उद्योगांची कार्य संस्कृती ही उच्च पातळीची असल्याने त्यांची प्रगती ही त्याचप्रमाणे सर्वोच्च पातळीची आहे, म्हणून कार्यसंस्कृतीवर आधी लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
मो.न. ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.