विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका जाहीर

26 जूनला मतदान : 1 जुलै रोजी मतमोजणी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता. 10 जून या दिवशी यासाठी मतदान होणार होते. मात्र एका कारणास्तव या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर आता या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. 7 जुलै 2024 रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे,  नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असणार आहे.  मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करुन ही निवडणूक पुढे ढकलली होती.

असा असेल निवडणुक कार्यक्रम

चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया 31 मे रोजी सुरू होणार आहे. तर 7 जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 जून रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 12 जून आहे. प्रत्यक्ष मतदान हे 26 जून रोजी होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.