ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात !

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

0

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क 

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना (ठाकरे गट) पाठिंबा मिळाल्याचे समजते. महाआघाडीकडून आता गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परिणामी नाशिक विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, शुक्रवार दि. 31 मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालीही वेगवान झाल्या आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी व राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना नाशिकचे ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले उमेदवार संदीप गुळवे यांना शिवसेनेने (ठाकरे गट) पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. गुळवे यांनीही त्यास दुजोरा दिला असून, याबाबत अधिकृत निर्णय दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे गुळवे यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांशी ठाकरे गटामार्फत चर्चा करण्यात आली होती.

याशिवाय नगर जिल्ह्यातून सर्व मिळून पाच जण या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांतून इच्छुक आहेत. ‘टीडीएफ’च्या एका गटाने नगरच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सर्वेसर्वा भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी घोषित केली, तर दुसऱ्या गटाने आप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली. याशिवाय संस्था चालकांपैकी लोणी येथील प्रवरा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र विखे, कोपरगावच्या संजीवनी शिक्षण संस्थेचे विवेक कोल्हे व राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष श्रीगोंदे तालुक्यातील दत्ता पानसरे असे अन्य तीनजण इच्छुक आहेत. संस्थाचालकांपैकी विखे व कोल्हे हे भाजपचे, तर पानसरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे समर्थक आहेत. त्यामुळे महायुतीमध्येच या उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे आहेत.

‘नगर’मधून दोन उमेदवार?

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालीही वेगवान झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यात आघाडी घेणाऱ्या शिक्षक लोकशाही आघाडीची (टीडीएफ) मात्र आता चार शकले झाली आहेत. या चारही गटांचे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातील दोन उमेदवार नगर जिल्ह्यातून असतील, अशी चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.