ट्रेनच्या पँट्रीच खाताय ?… एकदा वाचाच

पॅन्ट्री कारमधील किळसवाणा प्रकार समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय रेल्वेतील खराब जेवणाचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. प्रवाश्यांच्या अनेक तक्रारी येऊनही रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदीर फिरतांना व तेथील अन्नात तोंड टाकतांनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका प्रवाशाने या धक्कादायक घटनेचे पुरावे शूट केले असून त्याच्या सोशल मीडिया हँडलवर टाकला आहे.

पॅन्ट्रीमधील हा प्रकार पाहून लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. 15 ऑक्टोबरच्या रात्री ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा सगळा धक्कादायक प्रकार त्याच्या कॅमेरात कैद केला. व्हायरल व्हिडिओमध्ये पॅंट्रीमधील भांड्यावर एक उंदीर बसला आहे आणि अन्न खात आहे. मग दुसरा उंदीर त्या भांड्यावर उडी घेतो आणि भांड्यांमध्ये तोंड घालतो आणि मग पाल काढतो. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये उंदीर पॅन्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवर पळतांना आढळून येत आहे. जिथे भाजी साठी पाळल्या भाज्या उघड्यावर ठेवण्यात आल्या असल्याचे दिसून येत आहे. स्वयंपाकाची अनेक भांडी, प्लॅटफॉर्म आणि खाद्यपदार्थांची उघडी पाकिटे पॅन्ट्रीमध्ये कपाटात ठेवली होती.

मांगिरीश तेंडुलकर नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मंगिरिश हे 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत होते. त्यात त्यांचं लक्ष पँट्रीकडे कडे गेले व त्यांनी मोबाईल काढत सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला व पोस्ट करत म्हणाले, “एक रेल्वे चाहता आणि रेल्वे प्रवासी म्हणून माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. 15 ऑक्टोबर रोजी मी माझ्या कुटुंबासह 11099 मडगाव एक्सप्रेसने प्रवास करत होतो. रेल्वेचा चाहता असल्याने ट्रेनचे इंजिन कपलिंगची प्रक्रिया रेकॉर्ड करण्याचा विचार केला, म्हणून मी ट्रेनच्या मागच्या दिशेने चालायला लागलो. इथेच मला धक्का बसला. पॅन्ट्री कार ट्रेनमध्ये मला किमान 6-7 उंदीर दिसले. मी रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. ते म्हणाले ट्रॅकखाली 400-500 उंदीर आहेत. 4-5 गाडीमध्ये घुसले तर काय अडचण आहे. मग मी असिस्टंट स्टेशन मास्तर मीना सरांकडे गेलो. त्यांनी पँट्री मॅनेजरला कळवले. मी त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला की पॅन्ट्रीमध्ये खूप उंदीर आहेत, आता आपण काय करायचे. रेल्वे नेहमीच खराब डबा पाठवते,” असे मंगिरिश तेंडुलकर यांनी म्हटलं.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयआरसीटीसीने याबाबत कारवाई केली आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्यात आली असून, योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. पॅन्ट्री कारमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना समाज देण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी कीटक नियंत्रण वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. असे आयआरसीटीसीने म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.