एरंडोलात खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
एरंडोल –येथे म्हसावद रस्त्यालगतच्या बालाजी ऑइल मिल मध्ये सात ते आठ लाखांची खंडणी मागण्याकरता आलेल्या पाच युवक एक महिला व दोन मुली अशा एकूण आठ जणांना छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेतले. छाप्याची चाहूल लागल्याने मिलच्या बाहेर उभे असलेले एक महिला व तीन पुरुष हे दोन दुचाकींवर म्हसावद नाका मार्गे जळगाव कडे पलायन करत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करून महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दुरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना पकडून ताब्यात घेण्यात आल्याची कारवाई १६ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली.
एरंडोल येथील बालाजी मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना एक पुरुष व एका महिलेने त्यांच्या ऑइल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल असे धमकावून त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात खंडणी मागणारे इसम व महिला हे १६ जानेवारी २०२३ रोजी खंडणी मागण्या करता येणार असल्याचे फिर्यादीने पोलिसांना कळविले होते. त्यावरून पोनि ज्ञानेश्वर जाधव, सहा. पो नि गणेश अहिरे, पो उपनिरीक्षक शरद बागल, पो हे कॉअनिल पाटील, पो ना मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, महिला पोलीस नाईक ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने दोन महिला व दोन्ही इसम हे खंडणी मागण्या करता ऑइल मिल मध्ये गेले असता एक महिला व तीन पुरुष ऑईल मिल च्या बाहेर थांबले होते मिलमध्ये आलेल्या महिलेने अनिल काबरा यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतली असता लागलीच तिला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. छाप्याची चाहूल लागल्याने मिलच्या बाहेर उभ्या असलेल्या एक महिला व तीन पुरुष हे दोन दुचाकींवर म्हसावद नाका मार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून ताब्यात घेण्याची कामगिरी पोलिसांनी केली.
आरोपींमध्ये साक्षी तायडे, रा.भुसावळ, मोहिनी लोखंडे रा. पिंपरी पुणे ह मु. भुसावळ, शशिकांत सोनवणे (भुसावळ), सिद्धार्थ सोनवणे रा. (भुसावळ), रूपाली तायडे रा. (भुसावळ), मिलिंद बोदडे रा. तळणी ता. मोताळा , गजानन बोदडे रा. (भुसावळ), आकाश बोदडे रा. तळणी ता. मोताळा यांचा समावेश आहे.
आकाश बोदडे याने यापूर्वी वेळोवेळी बालाजी ऑइल मिल व कारवाई करण्याबाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करून अनिल काबरे यांच्याकडून ६० हजार ते ७० हजार रुपये रोख खंडणी घेतली आहे. तसेच वरील आरोपींसोबत आपसात संगनमत करून अनिल गणपती काबरा यांना बालाजी मिल बाबत तक्रार करण्याची धमकी दाखवून त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणीची मागणी करून पैकी एक लाख खंडणी स्वीकारली आहे.
या धाडीत एक लाख रुपये रोख आठ मोबाईल दोन दुचाकी एक डिझायर कार असा एकूण दहा लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींपैकी साक्षी तायडे व मोहिनी लोखंडे यांच्या वयाबाबत साशंकता असल्याने त्यांना बाल सुधार गृह जळगाव येथे दाखल करण्यात आले असून उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.