‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया’

0

लोकशाही विशेष लेख

“स्टार्ट अप” (Start up) म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते एक लघुद्योग, मग तो कोणताही असो. पण स्टार्टअप्सची खरी सुरुवात कशी झाली, कधी झाली आणि कोणी केली? या विषयी थोडक्यात माहिती घेऊया. भारत सरकारने ५ एप्रिल २०१६ रोजी एक नवीन योजनेची पायबांधनी केली, जिला नाव देण्यात आले ती म्हणजे “स्टार्ट अप इंडिया”. आता स्टार्ट अपचा अर्थ बघितला तर लक्ष्यात येते “स्टार्ट अप” – “सुरु करा” थोडक्यात देशाच्या प्रगतीला पुन्हा एका नव्या जोमाने सुरुवात व्हावी आणि देशाचा तरुण हाती पदवी प्रमाणपत्र घेऊन ठिकठिकाणी ठोकरा खात नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा स्वतः नोकरी देण्यासाठी कसा प्रबळ बनेल या विचारधारेला समोर ठेऊन घेतलेला हा निर्णय म्हणजे “स्टार्ट उप इंडिया” होय.

“स्टार्ट अप इंडिया” या योजनेमागील सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी आणि संपत्ती निर्माण करणे आणि देशातील रोजगार वाढवताना नवनवीन उत्पादने आणि सेवा विकसित करणे आणि भारत देशाला पुन्हा एक नाविन्यपूर्ण देश म्हणून जगात उभे करणे हे होय. थोडक्यात कुठले नाविन्यपूर्ण म्हणायचे झाले तर देशातील महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील उद्योजकतेला देखील पाठिंबा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांतील हा एक भाग होय. खरे पाहता “स्टार्ट अप” ही एक सुवर्णसंधी तर आहेच आहे, पण त्याचबरोरब एक सुविधा देखील आहे. २०१६ साली भारतात केवळ ५०० च्या आसपास लघुद्योग सुरु झालेले दिसून येत होते आणि तेच जर आजचा विचार केला तर अगणित उद्योगांना प्राधान्य मिळताना दिसत आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत भारत सरकाने अनेक सुविधा उबलब्ध करून दिल्या आहेत जसे कि फंडिंग – उद्योग आणि त्या उद्योगाला लागणाऱ्या खर्चाच्या स्वरूपानुसार एक आर्थिक मदत मिळणार, तसेच तुमच्या उद्योगाला नवे नाव आणि ओळख मिळणार, काही संशोधन करून निर्मित केलेले नाविन्यपूर्ण उत्पादन जर असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पेटंट किंवा ट्रेडमार्कसाठी लागणाऱ्या खर्चातदेखील चांगल्या प्रकारची सूट मिळणार आणि सर्वात विशेष महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेऊन रोजगार संधी उबलब्ध करण्याची एक नवीन विचारधारा तरुणांमध्ये निर्माण होताना दिसून येत आहे.

आपण अलख पांडे यांचे उदाहरण घेऊ शकतो ज्यांनी २०१४ साली ऑनलाईन शिक्षणाचा प्रचार करीत एक नवीन उद्योगाची पायाभरणी केली जो आज एक मोठा युनिकॉर्न स्टार्ट अप म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे या उद्योगाच्या माध्यमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना कमीत कमीत शुल्क देऊन शिक्षण संधी उपलब्ध होत असून हा येणाऱ्या पिढीसाठी सर्वात वेगाने वाढणारा एक प्रेरणादायी उद्योग बनलेला दिसून येत आहे. याचबरोबर अशी अनेक लहानमोठी स्टार्ट अप्स सुरु झालेली आपणास दिसून येतात ज्यात एक महत्वाचे नाव मला घ्यावेसे वाटते ते म्हंणजे एमबीए चायवला. ज्याने आपली एमबीए ची पदवी मध्यंतरीच सोडून एक छोट्याशा चहाच्या दुकानास सुरुवात केली आणि आज एक नामांकित उद्योग म्हणून तरुणांसाठी प्रेरणा बनताना दिसून येत आहे.

कोरोनाकाळात लॉकडाउन सारख्या मोठ्या संकटाला संधीचे सोने मानून अनेक तरुणांनी आपली छबी एक वेगळ्या प्रकारे उमटवलेली दिसून येत आहे. जसे की, लोकांना घरपोच फळभाज्या आणि किराणा पोहचवण्यासाठी अनेक उद्योगांची निर्मिती झालेली दिसतेय. ज्याचा पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या रहिवास्यांना घरपोच अनेक सुविधा मिळू लागल्या. ज्याचा फायदा त्या शहरातील नागरिकांना आजही होताना दिसून येत आहे. ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसे दोन्हीची चांगल्या प्रकारे बचत होत आहे, आणि देशाच्या पिढीस एक नवी रोजगार संधी मिळत आहे. ज्याचा देशाच्या सर्वांगीण विकासास खूप मोठा हातभार लागत आहे असे म्हणावयास हरकत नाही.

या विषयावर बोलावे तेवढे कमीच आहे, कारण विषय शेवटी नवीन पिढीचे भविष्य आणि देशविकासाचा आहे. देशाचा तरुण आज जागलेला दिसत आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता लक्ष्यात येते की, फायदा तोटा न बघता सुरुवातीचे ५ वर्ष जर निस्वार्थीपणाने काबाडकष्ट आणि मेहनत केली तर आपल्याला पुढे जाण्यास कोणीही थांबवू शकत नाही. येणाऱ्या पिढीस तसेच वाचकांनादेखील माझी हीच विनवणी असेल की, आपल्याला माहीत असलेली माहिती आपल्यापर्यंत न ठेवता समाज्याच्या तळागाळा पर्यंत कशी पोहचेल यासाठी विचार केला तर या विकसनशील भारत देशाला विकसित भारत देश म्हणून हाक मारायला फारसा वेळ लागणार नाही.

शुभांगी हिवरखेडे
केपीआयटी टेक्नॉलॉजी, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.