राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीमध्ये हरियाना, टे-टेमध्ये पंजाबला तर कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशला सांघिक विजेतेपद

0

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय स्पर्धेचा समारोप

पुणे,;- अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीमध्ये हरियाना संघाने विजेते तर महावितरणने उपविजेतेपद, टेबल टेनिसमध्ये पंजाबने विजेते तर गुजरातने उपविजेतेपद आणि कबड्डीमध्ये हिमाचल प्रदेशने विजेते तर महावितरणने उपविजेते पद पटकावले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या देशातील १४ विद्युत कंपन्यांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शुक्रवारी (दि. ३१) समारोप झाला.

या राष्ट्रीय स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाला संचालक श्री. संजय मारूडकर (महानिर्मिती) व श्री. सतिश चव्हाण (महापारेषण), पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे (महावितरण), मुख्य अभियंता श्री. किशोर राऊत (महानिर्मिती), आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण), मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण), अधीक्षक अभियंता श्री. संजय भागवत (महानिर्मिती), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. भरत पाटील, खजीनदार श्री. ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष गहेरवार व स्मिता कुदरीकर यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी समितीचे सचिव महापारेषणचे श्री. संदीप हाके, महावितरणचे श्री. शिरीष काटकर, महानिर्मितीचे श्री. अभिजित कुंभार यांच्यासह विविध समितीचे प्रमुख व सदस्यांनी पुढाकार घेतला.

कबड्डीच्या अंतिम सामन्यात थरार – अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरी प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर अंतिम फेरीत हिमाचल प्रदेश विरुद्ध महावितरण अशी लढत झाली. एक एक गुणासाठी चुरस निर्माण झाली. आक्रमक चढाईवर दोन्ही संघांनी अधिक भर दिल्यामुळे सामन्यात मोठी रंगत निर्माण झाली. महावितरकडून अमित जाधव याने आक्रमक चढाई करीत हिमाचल प्रदेशला आव्हान दिले. तर अमित हुमणे, प्रमोद ढेरे, रजत यांनीही जोरदार प्रयत्न केले. मात्र हिमाचल प्रदेशचे सतनामसिंग, गुरुप्रितसिंग, मनीषकुमार नेगी यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थोडीफार आघाडी कायम ठेवली. मध्यंतराजवळ हा सामना १७-१७ असा बरोबरीत होता. त्यानंतर मात्र हिमाचल प्रदेशने जोरदार चढाया करीत महावितरणचा ३९ विरुद्ध २२ या गुणांनी पराभव केला व कबड्डीचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपटू म्हणून प्रसाद आलेकर (महापारेषण), उत्कृष्ट बचावपटू – किरण देवडिगा (महावितरण) तर सतनाम सिंग याचा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.

टेबल टेनिसमध्ये पंजाब संघ अव्वल – टेबल टेनिसच्या स्पर्धेत पंजाबने विजेते तर गुजरातने उपविजेतेपद मिळविले. तर तिसऱ्या क्रमांकावर महावितरण व मध्यप्रदेश पॉवर कंपनीला समाधान मानावे लागले. टेबल टेनिसच्या एकेरी स्पर्धेत विकास महाजन (पंजाब) – सूवर्ण, रोहित महाजन (पंजाब) – रौप्य तर गुजरातच्या हार्दिक भट्ट याने कांस्य पदक मिळविले. तर दुहेरी स्पर्धेत विकास महाजन / रोहित महाजन (पंजाब) – सूवर्ण, चंद्रकांत के.जी. / हार्दिक भट्ट (गुजरात) – रौप्य आणि महावितरणच्या गणेश पाटील / समिर मस्के तसेच मध्यप्रदेश पॉवर कंपनीच्या कौशल त्रिवेदी व भौतक पघदार यांनी संयुक्तपणे कांस्यपदक मिळवले. पंजाबच्या विकास महाजन हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला.

कुस्तीमध्ये हरियाना संघाला विजेतेपद – मल्लांच्या आक्रमक डावपेचांनी कुस्ती स्पर्धा अतिशय लक्षवेधी ठरली. या कुस्तीस्पर्धेत हरियाना संघाने ४ सूवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावित सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणने १ सूवर्ण, दोन रौप्य आणि ३ कांस्यपदक पटकावत उपविजेतेपद मिळवले. कुस्तीस्पर्धेचे अनुक्रमे सूवर्ण, रौप्य व कांस्यपदकांचे विजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो – प्रवीण कुमार (हरियाना), सुनील बंडगर (महानिर्मिती), मोमीन मोहम्मद हरून (महावितरण), ६१ किलो – सुरेशकुमार (हरियाना), विनोद गायकवाड (महावितरण), किसन विरनक (महापारेषण), ६५ किलो- राजकुमार (महावितरण), रणजित (हरियाना), रणजित काशिद (महानिर्मिती), ७० किलो- रणबीर सिंह (पंजाब), सुखवीर (हिमाचल प्रदेश), अनंत नागरगोजे (महावितरण), ७४ किलो – नरेंदर (पंजाब), बिजेंदर (हरियाणा), जोतिबा आऊलकर (महावितरण), ७९ किलो – अजय कुमार (हिमाचल प्रदेश), शेरसिंग (पंजाब), सज्जन कुमार (हरयाणा), ८६ किलो- रवींदर (दिल्ली), आरण (हरियाना), दीपक (राजस्थान), ९२ किलो- बलबिर (हिमाचल प्रदेश), अमोल (महावितरण), हनीकुमार (पंजाब) ९७ किलो – अनिल कुमार (हरयाणा), ललित (पंजाब), दिगंबर (महापारेषण) आणि १२५ किलो वजन गटात राजकुमार (हरयाणा), अरमिंदर सिंग (पंजाब), भानुदास विसावे (महावितरण) यांनी पदकांची कमाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.