साने गुरुजी स्मारकाची फक्त घोषणा नको…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी यांचे वास्तव्य होते. ज्या प्रताप महाविद्यालय परिसरात गुरुजींचे वास्तव्य होते त्या परिसरात साने गुरुजी साहित्य नगरी उभारून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्सव सुरू आहे. साने गुरुजींच्या वास्तव्याने पवित्र असलेल्या या अमळनेरात गुरुजींचे एक चांगले स्मारक व्हावे आणि त्या स्मारकाचा फायदा नव्या पिढीला घेता यावा म्हणून राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात साने गुरुजी स्मारकासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केली. वास्तविक या आधी साने गुरुजींचे स्मारक अमळनेर व्हायला हवे होते. किमान स्मारक उभारण्यासाठी तसे प्रयत्न तरी व्हायला हवे होते. परंतु उशिरा का होईना उपमुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाचे अवचित्य साधून स्मारकाची घोषणा केली. परंतु फक्त घोषणा करून त्याचा उपयोग नाही. ते स्मारक प्रत्यक्ष उभारण्यासाठी विशेष प्रयत्न होऊन ते स्मारक निहित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. परंतु जळगाव जिल्ह्यात याआधी निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक त्यांचे माहेर जळगाव पासून अगदी जवळ असलेल्या आसोदा गावात उभारण्याची घोषणा गेल्या बारा वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केली आणि त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून त्याचे कामाला सुरुवात केली. तथापि सत्ता बदल झाल्यानंतर गेल्या बारा वर्षात या स्मारक बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. असोदा येथे अर्धवट स्मारकाचे बांधकाम झाले. त्यानंतर त्याचे काम बंद पडले. आज स्मारक भंगार अवस्थेत पडून आहे. तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मारकाच्या नावाने असा प्रकार होत असेल तर नव्या पिढीने काय बोध घ्यावा? आता निवडणुकीच्या तोंडावर असतांना जिल्हा नियोजन मंडळाकडून काही कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तीच अवस्था बालकवींच्या स्मारकाची म्हणता येईल. धरणगाव या बालकवींच्या जन्म गावी बालकवींचे भव्य स्मारक उभारण्याचे स्वप्न जिल्हा वासियांना दाखवण्यात आले. परंतु या स्मारकाची अवस्था सुद्धा अपूर्ण अवस्थेत नव्हे तर त्याला कसलीही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आदर्श व्यक्तिमत्त्वाचे स्मारक उभारण्याची घोषणा फक्त घोषणाच राहता कामा नये. साने गुरुजींचे स्मारक अमळनेरला झालेच पाहिजे. त्यांच्या स्मारकाला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. परंतु बहिणाबाई चौधरी आणि बालकवींच्या स्मारकाचे काय झाले? त्याचा लेखाजोखा सुद्धा जनतेला सादर झाला पाहिजे. हे दोष स्मारक गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असताना तिसरे साने गुरुजींचे स्मारक पूर्ण होईल का? हा जिल्हा वासियांच्या मनातील प्रश्न वजा शंका दूर झाली पाहिजे. तरच अजित पवांनी केलेल्या घोषणेला घोषणेवर विश्वास बसेल..

 

जळगाव जिल्ह्यात सध्या सुदैवाने तीन कॅबिनेट मंत्री लाभलेले असताना अनेक कामे प्रलंबित आहेत. त्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेला नेहमी सतावत असते. बरे तिन्ही मंत्री वजनदार आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू सहकार्य असून भाजपचे संकट मोचक आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास विश्वासू सहकारी आहेत. तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे तिघे मंत्री वजनदार असून त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे बहिणाबाई चौधरी अथवा बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या विलंबा मागची कारणे काय? किंवा आता तरी किमान ही स्मारके पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. तरच साने गुरुजींच्या स्मारकाबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. कारण लोकसभा विधानसभेत निवडणुका संपल्या की स्मारकाचा प्रश्न पुन्हा मागे पडायला नको, ही या निमित्ताने कळकळीची विनंती करावीशी वाटते…!

Leave A Reply

Your email address will not be published.